ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

शाब्बास महाराष्ट्र! ९९ लाख शेतकऱ्यांनी मिळवला ‘युनिक फार्मर आयडी’, राज्यात नाशिक विभाग आघाडीवर तर वर्धेत १०४ टक्के नोंदणी

सर्व शेतकऱ्यांना आता आधार कार्ड प्रमाणेच 'युनिक फार्मर आयडी' देण्यात येत आहे. तर आतापर्यंत राज्यात ८१.९२ टक्के शेतकऱ्यांचे 'युनिक फार्मर आयडी' तयार झाले आहेत.

नागपूर : राज्यात ॲग्रीस्टॅक प्रणालींतर्गत ९९ लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ‘युनिक फार्मर’ आयडी तयार झाले आहेत. पुढील आठवड्यात हा आकडा १ कोटींच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. जानेवारी महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांचे ‘युनिक फार्मर’ आयडी तयार करण्याची योजना सुरू झाली होती. अवघ्या साडेचार महिन्यांत राज्यात ८१.९२ टक्के शेतकऱ्यांचे ‘युनिक फार्मर’ आयडी तयार झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये राज्यात नाशिक विभाग हा सर्वात आघाडीवर दिसून येत आहे. तर, त्या पाठोपाठच छत्रपती संभाजीनगर विभाग आणि नागपूर विभागाची देखील कामगिरी दमदार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण ८४.८४ टक्के ‘युनिक फार्मर’ आयडी तयार झालं असून नागपूर विभागात हा आकडा ८४.१६ टक्के इतका आहे. ज्या वेगात ‘युनिक फार्मर’ आयडी तयार केल्या जात आहेत ते बघता पुढील महिन्यात सरकार आपलं उद्दिष्ट पूर्ण करेल असं दिसत आहेत. अर्थात यासाठी राज्यातील शेतकरी अभिनंदनास पात्र आहेत.

शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित? : केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि विविध योजनांचे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे यासाठी केंद्र सरकारने ॲग्रीस्टॅक प्रणालींतर्गत सुरू केलेल्या ‘युनिक फार्मर आयडी’ उपक्रमात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आधारकार्डप्रमाणे शेतकऱ्यांसाठी ‘युनिक फार्मर आयडी’ तयार करण्यात आले आहेत. युनिक फार्मर आयडीमुळे राज्यातील कोणताच शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित तर राहिला नाही ना? याची खातरजमा होणार आहे.

राज्यात नाशिक विभाग आघाडीवर : शेतकऱ्यांना शासनामार्फत दिले जाणारे लाभ हे ‘युनिक फार्मर’ आयडीच्या माध्यमातून मिळणार आहे. जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार देखील भविष्यात ‘युनिक फार्मर आयडी’ अंतर्गत केले जाणार आहेत. त्यामुळं येणाऱ्या महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाशी निगडित कामासाठी या युनिक फार्मर आयडीची मदत होणार आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. नाशिक विभागातील शेतकऱ्यांनी याला उदंड असा प्रतिसाद दिला आहे. नाशिक विभागात ८७.४४ टक्के ‘युनिक फार्मर आयडी’ तयार झाल्या आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वार्धक ९७.२८ टक्के शेतकऱ्यांनी आपली ‘युनिक फार्मर आयडी’ तयार केल्या आहेत. तर त्या पाठोपाठ अहमदनगर ९०.०१ टक्के तर जळगाव जिल्ह्यात ८१.१९ टक्के नोंदणीचं काम पूर्ण झालं आहे.

नागपूर, संभाजीनगरची स्थिती समाधानकारक : शेतकऱ्यांसाठीचे ‘युनिक फार्मर आयडी’ तयार करण्यात नागपूर विभाग, संभाजीनगर विभाग देखील मागे नाही. नागपूर विभागात एकूण ८४.१६ टक्के शेतकऱ्यांना ‘युनिक फार्मर आयडी’ मिळाले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर विभागात हा आकडा ८४.८४ टक्के नोंदणी झालेली आहे. अमरावती विभागात ८४.४७ टक्के, तर कोकण विभागात सर्वात कमी ६६.६८ टक्केचं शेतकरी नोंदणी झाली आहे. नाशिक विभागात ८७.४४ टक्के तर पुणे विभागात ७८.९१ टक्के इतक्या शेतकऱ्यांनी आपला ‘युनिक फार्मर आयडी’ मिळवला आहे.

वर्धा जिल्ह्यात १०४ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण : भविष्यात शेतकऱ्यांना ‘युनिक फार्मर आयडी’ प्राप्त शेतकऱ्यांना सर्व सोयी सुविधांचा लाभ मिळेल, हे लक्षात आल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. वर्धा जिल्ह्यात १०४ टक्के शेतकऱ्यांनी ‘युनिक फार्मर आयडी’ मिळवला आहे.

 

‘युनिक फार्मर आयडी’ कोणकोणत्या कामात येणार आहे : राज्य सरकार ‘ॲग्रीस्टॅक’योजनेंतर्गत युनिक फार्मर आयडी तयार केले जात आहेत. त्याचा थेट लाभ हा पी.एम किसान योजनेचे अनुदान मिळवणे, किसान क्रेडिट कार्ड बनवणे, पिक विमा काढणे, त्याअंतर्गत परतावा मिळवण्यासह अनेक योजनाचा लाभ मिळवता येणार आहे. या शिवाय केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून जाहीर पिकांची नुकसान भरपाई मिळवणे, पीक आणि शेती विषयक सर्वेक्षण करून घेणे, शेतमालाची एमएसपीच्या दराने विक्री करणे, कृषी विभागाच्या विविध योजना अंतर्गत कृषी निविष्ठा आणि इतर सेवांचा लाभ मिळवणे, बाजारपेठेची माहिती, कृषी विषयक कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवता येणार आहे. त्यामुळं कृषी विभागाला विशिष्ट पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन फोनद्वारे करता येणार आहे.

एका ‘क्लिक’वर माहिती उपलब्ध होणार : शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी ‘युनिक फार्मर आयडी’ आवश्यक ठरणार आहे. युनिक फार्मर आयडीच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्याची कुठे आणि किती जमीन आहे, कोणता शेतकरी कोणकोणत्या योजनांचा लाभ घेत आहे हे सर्व एका ‘क्लिक’वर माहित होणार आहे. चालू हंगामात राज्यातील किती शेतकऱ्यांनी कोणतं पीक घेतले आहेत, याचीही माहिती एका क्लिकवर मिळेल. एवढंच नाही तर, आता जिओ रेफरन्सिंगच्या मदतीनं प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचं डिजिटल नकाशे देखील उपलब्ध होणार आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.