४० वर्षे क्षतिग्रस्त पूल देतोय अपघाताला आमंत्रण
मेघा नदीला आलेल्या पुरामुळे पुलाची दयनीय अवस्था; गावकऱ्यांचे, राजकीय पदाधिकाऱ्यांची निवेदने बेदखल, यंत्रणेला कधी येणार हो जाग?

शिरसगाव कसबा : परतवाडा-करजगात शिरजगात कसबा मोर्शी नागपूर राज्यमार्गावरील १९८४ मध्ये बांधण्यात आलेला पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. या पुलाची दुरवस्था झाल्याने तत्काळ दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. सन २००७ व २०१७ मध्ये शिरजगाव कसबा मेघा नदीला महापूर आलेला असताना हा पूल क्षतिग्रस्त झालेला आहे.
विनायकराव कोरडे अचलपूर विधानसभेचे आमदार असताना देऊरवाडा मार्गावरील मेघा नदीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा निधीमधून १९९७ ला जिल्हा परिषदेने पुलाचे बांधकाम केले होते. हा पूलही धोकादायक असून नदीला पूर आल्यानंतर या दोन्ही पुलावरून नागरिकांना नदीचे पाणी कमी होईपर्यंत जाता येत नाही अशी स्थिती आहे.
दोन्ही पुलाचे बांधकाम करण्यात याते याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर व जिल्हा परिषद अमरावतीकडे ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी अनेकदा निवेदने दिलेली आहेत. मात्र नागरिकांच्या या मागण्यांकडे बांधकाम विभाग डोळेझाक करीत असल्याचा आरोप होत आहे.
पूणे जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर नागरिकांमध्ये आता पुलाच्या कामासाठीं होत असलेल्या प्रशासनाच्या या दिरंगाईबाबत संताप व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.

