शेतमालाच्या बाजारमूल्य निश्चितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेजिंग डेस्कची स्थापना करणार, शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळणार
हेजिंग डेस्क हा उपक्रम कृषी क्षेत्रातील विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले.

मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारमूल्य मिळावे यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे येथे कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू करण्यात आलाय. टप्प्याटप्प्याने इतर पिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. ‘सेबी’चे नियंत्रण असलेल्या एनसीडीईएक्स (NCDEX) संस्थेच्या कमोडिटी मार्केट्स आणि संशोधन संस्थेने (NICR) या प्रकल्पासाठी सहकार्य केलं असून, हा उपक्रम कृषी क्षेत्रातील विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले.
शेतकऱ्यांना बाजारातील अनिश्चिततेपासून वाचविण्यासाठीच हेजिंग डेस्क : कृषी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्याचा राज्याच्या सकल उत्पन्नात 12 टक्के वाटा आहे. मात्र राज्यातील शेतीमध्ये पिकांचे उत्पादन अजूनही नैसर्गिक घटकांवर अवलंबून असते. शेतीमध्ये पेरणी करूनही निश्चित क्षमतेनुसार उत्पादन आणि उत्पादित मालाला योग्य भाव मिळण्याबाबत शेतकऱ्यांना नेहमीच चिंता असते. शेतकरी पिकांचे उत्पन्न घेतो तरी मालाची किंमत ठरवणारा नसतो ही अनिश्चितता कमी करण्यासाठी शासनाकडूनदेखील विविध शासकीय धोरणे, सुधारित शेती पद्धती, विविध पीक विमा योजनांचे पाठबळ शेतकऱ्यांना दिले जाते. शेतीतून किमान उत्पन्न मिळवण्यासाठी शाश्वत उपायोजना करणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेऊन वैयक्तिक शेतकरी, मर्यादित संसाधने लक्षात घेऊन शेतकऱ्यांना बाजारपेठेतील ज्ञान मिळावे, यासाठी शासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. शेतकऱ्यांना बाजारातील अनिश्चिततेपासून वाचविण्यासाठी एककेंद्रित समर्पित कृषी हेजिंग डेस्कची स्थापना पुणे येथे करण्यात आली आहे.
हेजिंग डेस्कची कार्यपद्धती नेमकी कशी? : ‘हेजिंग डेस्क’मध्ये भविष्यकालीन विविध पर्यांयाचा विचार करण्यासाठी आणि जोखीम व्यवस्थापनासाठी शेतकरी उत्पादक संघटना (FPO) आणि क्लस्टर आधारित व्यवसाय संघटना (CBBOs) यांना सेवा कमोडिटी कराराबद्दल तज्ज्ञ माहिती देतील. तीन हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना हेजिंग साधने आणि धोरणांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बाजार ट्रेंड, पुरवठा-तारणातील बदल, जागतिक किमतींवर रिअल-टाइम मार्केट इंटेलिजन्सची माहिती देणे. शेतकरी उत्पादक संघटनाना आणि शेतकऱ्यांना शेतीजवळ साठवणूक केंद्रे उभारण्यासाठी एफपीओंना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
‘हेजिंग डेस्क’ म्हणजे काय? : ‘हेज’ म्हणजे बाहेरून येणाऱ्या संकटांपासून संरक्षण देण्यासाठी, त्यांना अटकाव करण्यासाठी बांधलेले साधन, घराला जसे दार, तसे शेताला कुंपण. किमतीच्या चढ-उतारातून निर्माण होणाऱ्या संकटापासून संरक्षण देणारे जे साधन तेही एक प्रकारचे कुंपणच आहे, ज्याला ‘हेजिंग’ म्हणतात. भविष्यकाळातील कमी होणाऱ्या किमतींपासून निर्माण होणारी जोखीम कमी करणे हा ‘हेजिंग’ चा मुख्य उद्देश आहे. भविष्यकाळातील वाढणाऱ्या किमतीचा फायदा घेण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंगचा वापर केला जाऊ शकतो. जागतिक बँकेच्या सल्ल्यानुसार आणि प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतमालाच्या किमतीतील जोखीम कमी करण्यासाठी वायदे बाजारात सहभागी होण्याकरिता तसेच त्यांना याबाबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यासाठी ‘हेजिंग डेस्क’ (Hedging Desk) सुरू करण्यात आलेला आहे.
जोखीम निवारण करण्यासाठी धोरणे तयार : ‘जोखीम व्यवस्थापन कक्षाअंतर्गत विविध प्रकारच्या जोखमींचा अभ्यास केला जाणार आहे’, जोखीम निवारण करण्यासाठी धोरणे तयार केली जातील. मका, कापूस आणि हळदीसाठी ॲन्युअल कमोडिटी प्राईस रिस्क असेसमेंट रिपोर्टस (‘Annual Commodity Price Risk Assessment Reports’) तयार करून यामध्ये पिकाची सद्यस्थिती, भविष्यकालीन अंदाज आणि धोरणविषयक उपाय सुचविले जातील. ‘कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज’ विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील. मका, कापूस आणि हळदीच्या उत्पादन आणि विपनणामध्ये सहभागी असलेल्या किमान 50 शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या वायदेबाजारातील व्यवहारासाठी नोंदणी आणि प्रत्यक्ष व्यवहार घडवून आणले जातील.
‘एनसीडीईएक्स’ आणि स्मार्ट प्रकल्पाचे सहकार्य : ‘एनसीडीईएक्स’ आणि स्मार्ट प्रकल्प यांच्यात 8 एप्रिल 2025 रोजी हेजिंग डेस्कबाबत करार करण्यात आलाय, या कराराचे नाव ‘शेतकरी उत्पादक संघटनासाठी हेजिंग डेस्कची स्थापना” असे आहे. यामध्ये कापूस, हळद आणि मका ही पिके पिकवणाऱ्या पट्ट्यांमधील शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) आणि शेतकऱ्यांवर अधिक लक्ष देण्यात येणार आहे. हिंगोली, वाशिम, सांगली, यवतमाळ, अकोला, नांदेड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड येथे प्राधान्य देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे कार्यालय पुणे येथे उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम राज्यात सुरू झाले आहे.
हेजिंग आणि ऑप्शन ट्रेडिंगमुळे सकारात्मक बदल होणार : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निवडक कृषी वस्तूंच्या हेजिंग आणि ऑप्शन ट्रेडिंगमुळे (Hedging and Options Trading) अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. यामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. उदाहरणार्थ, पेरणी करताना जर एखाद्या शेतकऱ्याला आपल्या पिकाच्या भविष्यातील विक्री किमतीबद्दल अनिश्चितता वाटत असेल, तर तो ऑप्शन ट्रेडिंगचा वापर करून एक विशिष्ट किंमत निश्चित करू शकतो. यामुळे बाजारात कितीही चढ-उतार झाले तरी त्याला एक किमान सुरक्षित किंमत मिळते. हेजिंगमुळे अनपेक्षित बाजार बदलांपासून संरक्षण मिळते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाबद्दल अधिक खात्रीशीर नियोजन करता येते. परिणामी, शेतकरी अधिक स्थिर उत्पन्न मिळवून आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित राहतात आणि त्यांच्या शेतीमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित होतील.
शेतकऱ्यांना याबाबत अधिक माहिती कुठे मिळेल ? : शेतकरी उत्पादक संघटना (FPO) आणि क्लस्टर आधारित व्यवसाय संघटना (CBBOs) व शेतकरी यांना हेजिंग डेस्कबद्दल माहिती आणि संपर्कासाठी पुढील क्रमांक आहेत. हेजिंग डेस्क (Hedging Desk) साठी संपर्क प्रकल्प अंमलबजावणी कक्ष – कृषी (स्मार्ट प्रकल्प) कार्यालाय पुणे येथील संपर्क पुढीलप्रमाणे आहेत. निविष्ठा आणि गुणनियंत्रण तज्ज्ञ बाबासाहेब जेजुरकर, मो. 9405002800, पीक विश्लेषक डॉ. ब्रह्मानंद देशमुख मो. 9561421509, एसीडीईएक्स आणि एनआयसीआर येथे (NCDEX – NICR) चे संपर्क- जोखीम निवारण आणि हेजिंग डेस्कचे प्रमुख सल्लागार नीरज शुक्ला मो. 9323614626, रिस्क अॅनालिस्ट – जोखीम निवारण व हेजिंग डेस्क गौतम आठवले मो. 9420419470, निधी मिश्रा मो. 9029391806 संपर्कासाठी ई मेल आयडी- hedgingdesk.smart@gmail.com आहे येथे हेजिंग डेस्कच्या अनुषंगाने याबद्दल अधिक माहिती मिळेल. एनसीडीईएक्स (NCDEX) संस्थेच्या https://www.ncdex.com या संकेतस्थळावर about us मध्ये हेजिंग डेस्कबद्दल आणि प्रशिक्षणाविषयी, हेंजिंग डेस्क जनजागृतीपर माहिती देखील उपलब्ध आहे.

