५५०० महिलांना दोन कोटींची बुडीत मजुरी
गरोदर स्तनदा मातांची तपासणी : आदिवासी महिलांना मिळाला तीन वर्षात योजनेचा लाभ

अमरावती : माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन प्रयन्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून मानव विकास कार्यक्रम राबविला जातो. सन २०२१-२४ अशा तीन वर्षात आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ५ हजार ५६८ गरोदर व स्तनदा मातांना बुडीत मजुरीचा लाभ मिळाला आहे. या लाभार्थ्यांना सुमारे २ कोटी २२ लाख ७२ हजार रुपयांची मजुरी देण्यात आली. यात आरोग्य विभागाकडून केलेल्या जनजागृतीत उद्दिष्ट निश्चितीचा प्रयत्न केला जात आहे.
राज्य शासनाने मेळघाटसाठी मानव विकास कार्यक्रम जिल्ह्यातील लागू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील गरोदर व प्रसूत झालेल्या मातांना बुडीत मजुरी दिली जाते.
शासनाच्या मानव विकास आयुक्तालया मार्फत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ही योजना राबविली जाते. धारणी व चिखलदरा तालुक्यांतील १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत गरोदर माता व स्तनदा मातांसाठी, तसेच ० ते २ वर्ष वयोगटातील बालकांच्या आरोग्य तपासणी शिबिरे व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रयरेषेखालील गरोदर माता व प्रसूत झालेल्या मातांना बुडीत मजुरीपोटी बुडीत मजुरी वाटप ही योजना राबविली जाते.
गरोदर, स्तनदा मातांची तपासणी मेळघाटातील १९ प्रा. आ. केंद्रामध्ये गरोदर व स्तनदा मातांची स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत दरमहा दोन वेळा आरोग्य तपासणी व उपचार केले जातात. मातांना शिबिरस्थळी ने-आण करण्याकामी वाहनाची मोफत व्यवस्था केली जाते. तसेच, त्या मातांना एक वेळचे भोजन दिले जाते. ० ते २ वर्ष वयोगटातील बालकांसाठी आरोग्य तपासणीकरिता बालरोग तज्ज्ञांमार्फत दरमहा दोन वेळा ० ते ६ महिने बालके यांची नियमित आरोग्य तपासणी व उपचार केले जातात, तसेच ६ महिने ते २ वर्ष वयोगटातील कमी वजनाच्या बालकांची आरोग्य तपासणी व उपचार केले जातात.
बुडीत मजुरी वाटप योजना आदिवासी भागात कार्यरत २ तालुक्यांतील १८ प्रा. आ. केंद्रातील ४ ग्रामीण रुग्णालयांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील गरोदर मातांना गरोदरपणाय्या काळात सातव्या व पहिल्या महिन्यात बुडीत मजुरीपोटी दोन हजार रुपये व प्रसूत झालेल्या मातांना बाळंतपणानंतर एक महिन्याच्या आत बुडीत मजुरीपोटी दोन हजार रुपये लाभार्थी महिलेच्या बँक खातेवर आरटीजीएसद्वारे जमा होतात.
आरोग्य शिबिरांबाबत जनजागृती केली जाते. परिणामी, आदिवासी भागातील माता व बालमृत्यूचे प्रमाण काही अंशी कमी होत आहे
– डॉ. सुरेश आसोले, डीएचओ, जि. प.
तीन वर्षांतील गरोदर व स्तनदा माता
२०२१-२२ -९००
२०२२-२३- २८०३
२०२३ – २४ – १८६५

