पैशाची मागणी करणा-या विरोधात त्वरित तक्रार करा-धारणी पंचायत समितीकडून घरकुल लाभार्थ्यांना आवाहन

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) धारणी : धारणी पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना अशा विविध शासकीय योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात येतात. मंजूर लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने हप्त्यांद्वारे निधी वितरित केला जातो. मात्र, या प्रक्रियेत कोणत्याही शासकीय किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केल्यास त्याबाबत त्वरित लेखी स्वरूपात तक्रार करावी, असे आवाहन पंचायत समिती धारणीच्या वतीने करण्यात आले आहे.लाभार्थ्यांकडून कंत्राटी ग्रामीण गृह अलीकडेच घरकुल अभियंता (RHE) पैशाची मागणी करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, या प्रकरणी पंचायत समिती कार्यालयात कोणतीही लेखी किंवा तोंडी तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. घरकुल तक्रार निवारणासाठी पंचायत समिती स्तरावर आधीच विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच गट विकास अधिकारी व सहायक गट विकास अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
लाभार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केल्यास तात्काळ लेखी स्वरूपात तक्रार करावी. तक्रारीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून, फोनवर अथवा व्हाट्सअॅपद्वारे संपर्क साधता येईल. याबाबत कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करु नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

