अचलपूर नगराध्यक्षपदी पुन्हा महिला! मतदानाची तारीखही इतिहासाशी जुळली

परतवाडा : अचलपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा महिला निवडली जाणार आहे. यंदाची निवडणूक थेट जनतेतून होणारी तिसरी नगराध्यक्ष निवडणूक ठरणार आहे. विशेष म्हणजे, २००१ मध्ये जसे २ डिसेंबरला मतदान झाले होते, तसाच योग तब्बल २५ वर्षांनंतर २०२५ मध्ये पुन्हा आला आहे.
२००१ मध्ये बहुसदस्यीय प्रणाली अंतर्गत हाजी मोहम्मद रफीक शे. गुलाब (रफिक शेठ) हे थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१६ मध्ये सुनीता नरेंद्र फिसके या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आणि जनतेमधून निवडल्या गेलेल्या अचलपूरच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष ठरल्या.
२०२५ च्या नगरपरिषद निवडणुकीत अचलपूर नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलाच या पदावर विराजमान होणार आहेत. २०१६ मध्ये ओबीसी महिलेकरिता आरक्षण होते, तर यंदा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागा आहे.
– इतिहासातली मनोरंजक जुळवाजुळव
१९७४ मध्ये अचलपूर नगरपालिकेवर मतदारांनी सुधाकरराव नाकील यांना अध्यक्ष म्हणून निवडून दिले होते. त्यावेळी त्यांचे चिन्ह ‘पंजा’ होते, परंतु ते काँग्रेसचे अधिकृत चिन्ह नव्हते. त्याच काळात परतवाडा (कॅम्प) नगरपालिकेवर अपक्ष बाबासाहेब भोकरे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांचे चिन्ह ‘फुल’ होते, परंतु ते गुलाबाचे, कमळाचे नव्हते.
१९७९ मध्ये शहर आणि कॅम्प या दोन्ही नगरपालिकांचे विलीनीकरण होऊन आजची अचलपूर नगरपालिका अस्तित्वात आली.
—
– पुन्हा महिलांचे वर्चस्व
अचलपूरमध्ये नगराध्यक्षपदी महिलांचे सातत्याने वाढते वर्चस्व दिसत आहे. सलग दुसऱ्यांदा महिला नगराध्यक्ष होणार ही बाब स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.

