सात महिन्याची ‘नकोशी’ वडिलानं दिली सोडून ; भारतीनं आजोबांच्या एकरभर शेतात पिकवली ‘इतक्या’ लाखांची संत्रा
सात महिन्याच्या नकोशीला वडिलानं आईसह हाकलून दिलं. आजोळी आलेल्या चिमुकलीला आजी आजोबांनी सांभाळलं. आता या चिमुकलीनं संत्रा शेतीतून तब्बल 7 लाखाचं उत्पन्न घेतलं.

अमरावती : अवघ्या सात महिन्याची असताना वडिलांनी आईसह तिला सोडून दिलं. आयुष्याच्या सुरुवातीलाच आलेला हा आघात कुठल्याही मुलीला मोडून टाकण्यासाठी पुरेसा असतो. पण अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यात येणाऱ्या करजगाव या छोट्याशा गावात राहणाऱ्या भारती पोहोरकर हिनं परिस्थिती पुढं हार मानली नाही. आजोळी आलेल्या आई, लेकीला आजी आजोबांनी मायेची उब दिली, आधार दिला आणि फक्त एक एकर शेताच्या भरवशावर तिचं भविष्य घडवलं. आज उच्च शिक्षण घेऊन भारतीनं आपल्या आजोबांच्या शेतात संत्र्याची बाग फुलवली. विशेष म्हणजे यावर्षी तिच्या शेतातील 140 संत्रा झाडांवर लागलेली संत्री तिनं सात लाख रुपयांना विकली. भारती पोहोरकर या शेतकरी कन्येच्या संघर्षासंदर्भात ‘खरा संवाद’चा हा स्पेशल रिपोर्ट.
एक एकर शेती आणि संघर्षाचं बालपण : आजी शांताबाई किसनराव भोगे आणि आजोबा किसनराव नागोजी भोगे यांच्याकडं केवळ एक एकर शेती होती. त्या शेतीत येईल ते पीक आणि येईल ते उत्पन्न याच्या आधारावर त्यांनी आपल्या घरी परत आलेल्या मुलीचं आणि नातीचं संगोपन केलं. गरीबी होती, अडचणी होत्या, पण माया आणि कष्ट या बळावर या कुटुंबानं येणाऱ्या संकटांचा सामना केला. आज आजी, आजोबा हयात नाहीत मात्र त्यांनी दिलेली शेती आणि संस्कार हे भारती पोहोरकरच्या यशाचा पाया ठरला आहे.
शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि शेतीकडं वळली वाट : भारती पोहोरकर हिनं वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण अमरावती शहरात पूर्ण केलं. स्पर्धा परीक्षाही दिल्यात, पण अपेक्षित असं यश मिळालं नाही. काही काळ तिनं चक्क पेट्रोल पंपावर नोकरी केली. लहानपणापासून शेतीचा अनुभव असल्यानं शेतकऱ्याची मुलगी म्हणून तिचं मातीशी नातं घट्ट होतं. शेवटी आपल्या शेतात काम करण्याचा भारतीनं निर्णय घेतला. “या शेतातूनच आयुष्यानं कलाटणी घेण्यास सुरुवात केली,” असं भारती पोहोरकर ‘खरा संवाद”शी बोलताना म्हणाली.
भाजीपाल्यापासून संत्रा, फळबागेपर्यंतचा प्रवास : “सुरुवातीला एक एकर शेतीत भाजीपाला पीक घेतलं. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नानं आत्मविश्वास वाढला. यानंतर चांदूर बाजार कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन आणि गावातील अनुभवी शेतकऱ्यांचा सल्ला घेत शेतात संत्र्याची झाडं लावण्याचा धाडसी निर्णय घेतला. अवघ्या तीन-चार वर्षात एक एकर शेतात 140 संत्र्याची झाडं उभी राहिली. चार वर्षापर्यंत मिरची आणि कांदा हे आंतरपीक घेतलं. शेती नव्या पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला. सेंद्रिय व जीवाणूजन्य खतांचा काटेकोर वापर, जैविक बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांचा आलटून पालटून वापर करून जमिनीची पोत सुधारली,” असं भारती पोहोरकर म्हणाली.
काटेकोर नियोजन आणि सात लाखांचं उत्पादन : “यावर्षी मृगात संत्र्याला बहार आला. योग्य नियोजन वेळेवर फवारणी आणि मेहनतीमुळं ही संत्राबाग थेट सात लाख रुपयांना विकली गेली. आज ही बाग केवळ उत्पादन देत नाही, तर आईला आणि मला जगण्याचा नवा विश्वास आणि हिम्मत देणारी ठरली,” असं भारती सांगते.
महिला शेतकरी म्हणून केला संघर्ष : “महिला शेतकरी म्हणून नशीबी आलेला संघर्ष हा कठीणच होता. शेतात कामासाठी वेळेवर मजूर मिळत नव्हते. अशा प्रसंगात स्वतः आईसोबत सर्व कामं केली. जी कामं स्वतः करता येतील, ती सर्व कामं मी स्वतःच करायची. पाणी देणं, खत टाकणं, फवारणी करणं बहुतेक सगळी कामं मी स्वतः केली. संत्रा झाड सरळ राहावी यासाठी बांबू उभारणी सारख्या कामांसाठी मजूर लावलेत,” असं भारती म्हणाली.
आईच्या डोळ्यात आनंदाश्रू : “माझी मुलगी मुलासारखं सगळं काम करते. शेतातलं सगळं तिनं स्वतः केलं. आज सात लाख रुपयांचं उत्पन्न आलं. माझ्या मुलीमुळे मला सुखाचे दिवस आले,” असं सांगताना 68 वर्ष वय असणारी भारतीची आई सुमित्रा पोहोरकर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

