ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रसांस्कृतिक

प्रजासत्ताक दिनाचा उत्साह : शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजवंदन

प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर होणाऱ्या भव्य संचलनात 'कोकण पर्यटन' या संकल्पनेवर आधारित आकर्षक चित्ररथ पाहायला मिळाला.

मुंबई : भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन आज (26 जानेवारी) देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. या निमित्तानं महाराष्ट्र सरकारचा मुख्य कार्यक्रम मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. त्यानंतर शिवाजी पार्कात शौर्य प्रदर्शन आणि विविध शासकीय विभागांकडून चित्ररथांच्या माध्यमातून सांस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं.

 

शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिन साजरा : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये सकाळी ध्वजवंदन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीनं काम करण्याचा संदेश दिला. तसंच संविधान, नागरी हक्क आणि जबाबदाऱ्यांचं भान प्रत्येक नागरिकानं बाळगायला हवं, असंही त्यांनी म्हटलं. याशिवाय, नागरिकांना एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी काम करण्याचं आवाहनही केलं. राष्ट्रीय एकात्मता, संघटनेचा आदर आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचं जपणूक करण्याचंही त्यांनी राज्याला संबोधित करताना सांगितलं. तसंच सरकार करत असलेल्या कल्याणकारी योजनांची माहितीही दिली. यावेळी अनेक आमंत्रित नागरिक, शालेय विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिकही शिवाजी पार्कात उपस्थित होते. दरवर्षी 26 जानेवारीला देशभरात स्वातंत्र्य, संविधान आणि लोकशाहीचे प्रतीक म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यावेळी राज्यात विविध ठिकणी ध्वजवंदन, परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळे आयोजित केले जातात, ज्यात नागरिकांचा मोठा सहभाग असतो.

 

प्रशासकीय विभागांनी चित्ररथांतून दाखवला आपला उत्साह : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं राज्यस्तरीय ध्वजवंदन समारंभ उत्साहात पार पडला. प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर होणाऱ्या भव्य संचलनात ‘कोकण पर्यटन’ या संकल्पनेवर आधारित आकर्षक चित्ररथ पाहायला मिळाला. महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागानं या चित्ररथातून कोकणचा निसर्ग, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक पर्यटनाचा संगम साधण्यात आला होता. ज्यात प्रामुख्यानं विजयदुर्ग किल्ला, गणपतीपुळे येथील मंदिर, निसर्गरम्य कोकण किनारपट्टी आणि कोकणच्या समृद्ध संस्कृतीचं प्रभावी सादरीकरण करण्यात आलं. त्याचबरोबर स्कुबा डायव्हिंग, डॉल्फिन, बनाना राइड आणि रो-रो फेरी यांसारख्या आधुनिक पर्यटन सुविधांचं कलात्मक प्रदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध शासकीय विभागंकडून चित्ररथाच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली. नौदल, लष्कर आणि एअर फोर्ससह मुंबई पोलीस, अग्निशमन दल आणि इतर नागरी सेवा दलांनी या परेडमध्ये आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं. त्याचबरोबर मुंबई वाहतूक पोलीस, कौशल्य विकास विभाग, जलसंपदा विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, आदिवासी विकास विभाग, ग्रामविकास, शिक्षण विभागांनीही आपले कल्पक आणि आकर्षक चित्ररथ सादर करत महाराष्ट्राच्या विविधतेनं नटलेल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.