लाडक्या बहिणी होतील आत्मनिर्भर… रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आमदार श्वेता महाले यांनी सुरू केली ‘देवाभाऊ लाडकी बहीण’ पतसंस्था
चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी 'देवाभाऊ लाडकी बहीण' या नावानं नागरी सहकारी पतसंस्थेची सुरुवात केली आहे. या पतसंस्थेचं उद्धाटन रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते झालं.

बुलढाणा : चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी ‘देवाभाऊ लाडकी बहीण’ या नावानं नागरी सहकारी पतसंस्थेची सुरुवात केली आहे. या पतसंस्थेचं उद्धाटन आज (9 ऑगस्ट) रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते झालं. या पतसंस्थेची वैशिष्ट्ये म्हणजे संपूर्ण संचालक मंडळ महिलांचं आहे आणि ही पतसंस्था फक्त महिला आणि मुलींसाठीच कार्यरत असणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेनं एक ठोस पाऊल म्हणून या पतसंस्थेची स्थापना करण्यात आल्याचं आमदार महाले यांनी सांगितलं.
मंत्री बावनकुळेंकडून आमदार महालेंचं कौतुक : या उपक्रमाच्या निमित्तानं महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आ. श्वेता महाले यांनी घेतलेलं हे पुढाकाराचं पाऊल कौतुकास्पद असल्याचं मत महसूल मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केलं. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू झालेल्या या पतसंस्थेमुळे “लाडक्या बहिणी” आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. या उद्घाटन सोहळ्याला कामगार मंत्री आकाश फुंडकर, चिखलीच्या आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, तसंच हजारो “लाडक्या बहिणी” मोठ्या उत्साहात उपस्थित होत्या.
‘महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचा उद्देश’ : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात आमदार महाले यांचं तोंडभरून कौतुक केलं. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, “ही पतसंस्था महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे. रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला साजेसा हा उपक्रम असून, यामुळे समाजातील लाडक्या बहिणींना नवी दिशा मिळेल.” सोबतच, अशा योजनांमुळे ग्रामीण तसंच शहरी भागातील महिलांना आर्थिक समृद्धी आणि स्वावलंबनाची संधी मिळेल, असा विश्वासही मंत्री बावनकुळेंनी व्यक्त केला.
आमदार श्वेता महाले काय म्हणाल्या? : यावेळी आमदार श्वेता महाले यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, “ही पतसंस्था महिलांना कमी व्याजदरात कर्ज, बचत खाती आणि इतर आर्थिक सेवा पुरवेल. यामुळे महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तसंच त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आधार मिळेल”. स्थानिक महिलांनी या उपक्रमाचं उत्साहात स्वागत केलं असून, त्यांना यामुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळण्याची आशा आहे.
‘महिलांना सक्षम करणं हे माझे स्वप्न’ : श्वेता महाले यांनी पुढे बोलताना सांगितलं, “महिलांना सक्षम करणं हे माझं स्वप्न आहे आणि ही पतसंस्था त्याच दिशेनं टाकलेलं एक पाऊल आहे.” हा उपक्रम इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी व्यापक अपेक्षादेखील आता स्थानिक महिलांकडून व्यक्त केली जात आहे.

