ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

गुप्तधन मिळवण्यासाठी घरातच खोदला खड्डा; अघोरी कृत्य करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

यवतमाळ शहरात गुप्तधन मिळवण्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरामध्ये खड्डा करून धार्मिक विधी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

यवतमाळ : शहरातील एका घरामध्ये गुप्तधन काढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये 5 जणांच्या टोळीला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. यातील एक जण फरार झाला आहे. यावेळी घटनास्थळावर अघोरी पूजेचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तर या प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली आहे. ही कारवाई मध्यरात्रीच्या सुमारास साकुरहेटी येथे करण्यात आल्याची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नील नाईक यांनी दिली.

काय आहे घटना? : आकाश उखंडराव कोटनाके (30), सोनू उर्फ कुणाल सुरेश खेकारे (38) वर्ष, वृषभ मनोहर तोडसकर (24), प्रदीप रामकृष्ण इळपाते (50), बबलु उर्फ निश्चय विश्वेश्वर येरेकर (26) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील एक आरोपी फरार झाला असून, पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे. यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकुर येथील आकाश उकंडराव कोटनाके यांच्या घरात काही इसम हे बाहेरगावावरून आले होते. तसेच ते घरात काही संशयास्पद हालचाली करत होते. त्यावरून यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार सुनील नाईक यांनी वरिष्ठांना अवगत करून तत्काळ स्टाफसह घटनास्थळी पोहोचले आणि सापळा रचून कार्यवाही केली. यावेळी घरात 4 जण सापडले आणि घरातील मागील बाजूच्या खोलीत पोलिसांना मातीचा मोठा खड्डा खोदलेला दिसला. सदरील खड्ड्याच्या बाजूला लिंबू, नारळ, ओटीचं सामान, अघोरी पूजेच्या साहित्याचे ताट तसेच खोदकामाचे साहित्य मिळून आले. दोन व्यक्ती हे रात्री अंधाराचा फायदा घेऊन मागील दारातून पळून गेले. परंतु पोलिसांनी शिताफीने त्यांचा पाठलाग करीत गाव परिसरात शोध घेतला आणि त्यातील एक आरोपीला शोधून ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नील नाईक यांनी दिली.

 

गुन्हा दाखल : घटनास्थळावरून पोलिसांनी अघोरी पूजेचे साहित्य, खोदकामाचे साहित्य आणि 3 मोटरसायकल ताब्यात घेतलंय. सर्व आरोपींविरोधात यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास ठाणेदार सुनील नाईक करीत आहेत. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील नाईक, सपोनि प्रवीण मानकर, संजय राठोड, रमेश कोंदर, रणजीत जाधव, गजानन खांदवे, सचिन पातकमवार, पंकज नेहारे, तुशाल जाधव, रुपेश नेव्हारे यांनी केलीय.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.