शेअर मार्केटमध्ये बक्कळ नफ्याचे आमिष दाखवत ४८ हजारांची ऑनलाईन फसवणूक

दर्यापूर (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमधून बक्कळ नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत येथील एका ४२ वर्षीय गृहस्थाची तब्बल ४८ हजार ५०४ रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी दर्यापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैयद नावेद सैयद बासित (वय ४२, रा. पठाणपुरा, दर्यापूर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी एका इसमाने त्यांना व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठवून “शेअर मार्केटमध्ये आकर्षक नफा मिळवून देतो” अशी बतावणी केली. त्यानंतर त्यांना टेलिग्रामवरील एका लिंकद्वारे एका सोशल मीडिया चॅनलशी जोडले गेले. त्या चॅनलमधील आणखी एका इसमानेदेखील मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दिले.
या आमिषाला बळी पडून सैयद नावेद यांनी संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात ४८ हजार ५०४ रुपये पाठविले. मात्र, त्यानंतर ना नफा झाला, ना रक्कम परत मिळाली. उलट समोरच्यांकडून टोलवाटोलवी करण्यात येऊ लागली. संशय आल्यावर सैयद नावेद यांनी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुप बंद करण्यात आला होता.
फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी दर्यापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

