तुर्भे स्टोअर येथील क्रूर हत्येप्रकरणात माजी नगरसेवक अर्जुन अडांगळे यांना अटक चार दिवसांची पोलीस कोठडी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

-शिवकुमार गुप्ता (प्रतिनिधी) नवी मुंबई– तुर्भे स्टोअर परिसरात घडलेल्या क्रूर हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी माजी नगरसेवक अर्जुन अडांगळे आणि त्यांचे साथीदार विधान मंडल यांना अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना तुर्भे स्टोअर येथील नवजीवन हायस्कूलच्या गेटजवळील बाथरूममध्ये घडली. तेथे सुधाकर पाटोळे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. घटनास्थळी दारूची बाटली आढळून आली असून, पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर लोकेशनची तपासणी सुरू केली आहे.
दरम्यान, या घटनेत राजकीय दबाव टाकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवजीवन शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी दररोज या मार्गाने ये-जा करत असल्याने शाळेचा परिसरही भयभीत झाला आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे कोंबिंग ऑपरेशन राबवून गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

