महत्वाचे

विश्वचषक फायनलपूर्वी ‘सचिन सरां’चा एक फोन अन्…; विश्वविजयानंतर हरमनप्रीत कौरचा मोठा खुलासा

भारतीय महिला क्रिकेट संघानं पहिल्यांदाच विश्वचषक जिंकत इतिहास रचला. दरम्यान, हरमनप्रीत कौरनं विश्वविजयानंतर एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

नवी दिल्ली Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघानं पहिल्यांदाच विश्वचषक जिंकत इतिहास रचला. टीम इंडियानं घरच्या मैदानावर आयोजित महिला वनडे विश्वचषक ट्रॉफी जिंकली. टीम इंडियानं आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. या विजयात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं मोठी भूमिका बजावली. दरम्यान, हरमनप्रीत कौरनं विश्वविजयानंतर एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

 

हरमनप्रीत कौरचा मोठा खुलासा : विश्वचषक फायनलपूर्वी हरमनप्रीत कौरला खूप सल्ला मिळाला होता, परंतु भारतीय कर्णधारासाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं दिलेला सल्ला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ऐतिहासिक फायनलपूर्वी तेंडुलकरनं महिला संघाच्या कर्णधार हरमनप्रीतला फोन केला होता. हरमनप्रीतनं आयसीसीच्या रिव्यू मध्ये म्हटलं आहे की, “सचिन सरांनी सामन्यापूर्वी फोन केला. त्यांनी आपला अनुभव सांगितला आणि आम्हाला संतुलन राखण्याचा सल्ला दिला. जेव्हा सामना वेगानं सुरु असतो तेव्हा हळू खेळण्याचा प्रयत्न करा, कारण जर तुम्ही खूप वेगानं खेळलात तर तुम्ही हरण्याचा धोका पत्करता.”

विश्वचषक जिंकण्याचा आनंददायी अनुभव : नवी मुंबईत फायनल जिंकून पाच दिवस झाले आहेत, परंतु 16 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर अचानक सर्वकाही कसं बदललं यानं हरमनप्रीत अजूनही आश्चर्यचकित आहे. ती म्हणाली, “आम्ही जेव्हा जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा ते आम्हाला विश्वविजेते म्हणतात. हा एक वेगळा अनुभव असतो. आम्ही अशा अनुभवाची वाट पाहत होतो. माझे पालक तिथं होतं. त्यांच्यासमोर विश्वचषक जिंकणं हा एक खास क्षण होता. लहानपणापासूनच त्यांनी मला असं म्हणताना ऐकलं आहे की, मला भारतीय जर्सी घालायची आहे, माझ्या देशासाठी खेळायचं आहे, संघाचं नेतृत्व करायचं आहे आणि विश्वचषक जिंकायचा आहे.”

भारताचा 52 धावांनी विजय : भारतीय महिला क्रिकेट संघानं आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. या विजयासह, भारतीय संघानं पहिल्यांदाच महिला विश्वचषक ट्रॉफी उंचावली. रविवार, 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं लक्ष्य ठेवलं. दबावानं भरलेल्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी हे लक्ष्य पुरेसं होतं. धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 246 धावाच करु शकला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.