बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन : कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘प्रहार’
माजी मंत्री तथा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केलं.


अमरावती : माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. आज बच्चू कडू यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या विरोधातील बॅनर, पोस्टर जाळून आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनरही आंदोलकांनी जाळले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. प्रहारच्या आंदोलकांनी टॉवर चढून आंदोलन केलं. तर जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यकर्त्यांनी ‘प्रहार’ केला.
कार्यकर्त्यांनी केला पालकमंत्र्यांचा केला निषेध : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासह तरुणांना रोजगार मिळावा आदी मागण्यांसाठी प्रहारचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू रविवारपासून गुरुकुंज मोझरी इथं उपोषणावर बसले आहेत. बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मात्र अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची साधी चौकशीही केली नाही. याबाबत प्रहार कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध नोंदवला आहे. कार्यकर्त्यांनी काही वेळासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता बंद रोखून धरला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असणारे पोस्टर कार्यकर्त्यांकडून जाळण्यात आले.
आसेगाव इथं टॉवरवर चढले कार्यकर्ते : माजी मंत्री बच्चू कडू यांनी विविध मागण्यासाठी उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणामुळे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अमरावती परतवाडा मार्गावर असणाऱ्या आसेगाव इथं प्रहाराचे अनेक कार्यकर्ते मोबाईल टॉवरवर चढलेत. बच्चू कडू यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय टॉवरवरुन खाली उतरणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. आंदोलक आक्रमक झाल्यानं प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली आहे.

