राकेश टिकैत यांनी केलं बच्चू कडू यांचं तोंडभरुन कौतुक; म्हणाले, “आमदार असो की नसो…”
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत त्यांचं कौतुक केलं. पाहा नेमकं काय म्हणाले टिकैत...

अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नसानसात आंदोलन भरलेलं आहे. सध्याचे देशातील सरकार हे आंदोलनकर्त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी काळात आंदोलनकर्त्ये खूपच कमी असतील. मात्र, बच्चू कडू हे यातीलच एक आहेत, जे शेतकऱ्यांसाठी लढत राहतील, असं म्हणत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बच्चू कडू यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसेच सातबारा कोरा करण्यासह इतर काही मागणीसाठी बच्चू कडू यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं आहे. या आंदोलनाला राकेश टिकैत यांनी भेट दिली. तसेच टिकैत यांनी यावेळी कडू यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला.
बच्चू कडूंचं केलं कौतुक : बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळावर उपस्थितांना राकेश टिकैत यांनी संबोधित केलं. “शेतकऱ्यांच्या लढाईत महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि हरियाणाचा लढा हा कायम एकत्रित राहिला आहे. बच्चू कडू हे काय आज आंदोलन करत नाहीत.. शेतकऱ्यांसाठीचा त्यांचा लढा हा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. जेव्हा ते आमदार होते तेव्हा ते विधानभवनात शेतकऱ्यांसाठी बोलायचे, आता ते आमदार नाहीत तरीही शेतकऱ्यांसाठी तसेच दिव्यांगांसाठी आंदोलन करत आहेत. आज महाराष्ट्र आणि केंद्रात जे सरकार सत्तेत आहे ते आंदोलनकर्त्यांना, तसेच इतर राजकीय पक्षांना दाबण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक मुद्द्याच्या नावाखाली एकमेकांना भडकवण्याचे काम सुरु आहे. अशा या सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्या रक्तातच आंदोलनाची धार आहे,” असं म्हंटल राकेश टिकैत यांनी बच्चू कडू यांचं कौतुक केलं.
शेतकऱ्यांची संघटना नसल्याबाबत खंत : “भारतात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात बघायला मिळतात. खरंतर संपूर्ण देशात जी कृषी पॉलिसी लागू आहे, तीच महाराष्ट्रातही आहे. मात्र, तरीही महाराष्ट्रातूनच सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करत आहेत, कारण याठिकाणी शेतकऱ्यांची मजबूत अशी संघटना नाही,” अशी खंत राकेश टिकैत यांनी व्यक्त केली.

