‘मातृभाषेत अभ्यास केल्याने समज वाढते’; मुंबईतील शाळेला भेट देत सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी स्पष्टच सांगितलं
सरन्यायाधीशांनी त्यांच्या शाळेतील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमधील वर्गखोल्यांना भेट दिली. तसेच ग्रंथालय आणि कला विभागाला भेट दिली.

मुंबई- मातृभाषेत अभ्यास केल्याने वैचारिक समज वाढते आणि आयुष्यभरासाठी मजबूत मूल्ये रुजतात जी जीवन जगण्यासाठी फायदेशीर ठरतात, असंही भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणालेत. मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळेतील त्यांच्या विद्यार्थीदशेची आठवण करून देताना सरन्यायाधीशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सरन्यायाधीशांनी त्यांच्या शाळेतील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमधील वर्गखोल्यांना भेट दिली. तसेच ग्रंथालय आणि कला विभागाला भेट दिली. त्यांच्या जुन्या वर्गमित्रांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.
शिक्षणाने आणि मूल्यांनी माझ्या जीवनाला दिशा दिली : अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सरन्यायाधीशांनी या संस्थेत प्राथमिक ते माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेतले. त्यांच्या सुरुवातीच्या जीवनाला आकार देणाऱ्या शिक्षकांबद्दल त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. न्यायमूर्ती गवई म्हणाले, आज मी ज्या पदावर पोहोचलो आहे, त्यात माझे शिक्षक आणि या शाळेचे मोठे योगदान आहे. येथून मिळालेल्या शिक्षणाने आणि मूल्यांनी माझ्या जीवनाला दिशा दिली. सार्वजनिक भाषणातील माझा प्रवास या व्यासपीठावरून सुरू झाला. भाषण स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून माझा आत्मविश्वास वाढला. या संधींमुळेच मी आज जे काही आहे ते आहे, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.
विधिमंडळ उद्या सत्कार करणार : महाराष्ट्र विधिमंडळ मंगळवारी सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार करणार आहे. रविवारी विधिमंडळ सचिवालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, हा सत्कार समारंभ विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. सरन्यायाधीश विधिमंडळाच्या आवारात भारतीय संविधान या विषयावर विधानसभेला संबोधित करतील. महाराष्ट्राचे रहिवासी असलेले न्यायमूर्ती गवई यांना सरन्यायाधीश झाल्याबद्दल सत्कार करण्यासाठी राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि हा समारंभदेखील त्याचाच एक भाग आहे. ते या वर्षी २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.

