सैन्यदलानं ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं किती नुकसान केलं? प्रथमच हवाई दल प्रमुखांनी दिली माहिती
बंगळुरू: ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं नेमकं किती नुकसान झालं आहे? याची आजपर्यंत माहिती समोर आली नव्हती. भारतीय हवाई दलानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईबाबत हवाई दलाचे प्रमुख एपी सिंग यांनी ही माहिती प्रथमच दिली आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपल्या सैन्यानं पाकिस्तानची सहा विमाने पाडली आहेत. एस-४०० संरक्षण प्रणाली युद्धात भारताकरिता खरे गेम चेंजर ठरल्याचं हवाई दलाचे प्रमुख एपी सिंग यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला झालेल्या नुकसानीबद्दल भारतीय हवाई दलानं हे प्रथमच अधिकृत वक्तव्य केलं आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ६ पाकिस्तानी विमाने पाडली. तर ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला, असे हवाई दल प्रमुखांनी सांगितले. यात पाच लढाऊ विमाने आणि टेहळणी करणारे कदाचित एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टमचे विमान होते-हवाई दलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल एपी सिंग
बंगळुरू येथील एका कार्यक्रमात एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले, ” आमच्याकडून (बहावलपूर – जैश-ए-मोहम्मद मुख्यालयात) झालेल्या नुकसानाचे आधीचे आणि त्यानंतरचे फोटो आहेत. तिथं जवळजवळ कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. आजूबाजूच्या इमारती जवळजवळ पूर्णपणे सुरक्षित आहेत. आमच्याकडे केवळ उपग्रहाच्या प्रतिमाच नाहीत तर स्थानिक माध्यमांकडून मिळालेले फोटोदेखील होते.
यावेळी ऑपरेशन सिंदूर दरम्यान मुरीदके-लष्कर मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या आधीचे आणि नंतरचे फोटो हवाई दल प्रमुखांनी दाखवले. पुढे हवाई दल प्रमुख म्हणाले, हा मुरीदके-एलईटीच्या वरिष्ठ नेत्यांचा निवासी परिसर आहे. ही त्यांची कार्यालयीन इमारत होती. तिथे ते बैठका घेण्यासाठी एकत्र येत असत.
आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं उत्तम काम केलं आहे. आम्ही अलीकडेच खरेदी केलेली एस-४०० प्रणाली एक क्रांतिकारी बदल ठरली आहे. शत्रूला एस-४०० संरक्षण यंत्रणा भेदण्यात अपयश आलं- हवाई दलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल एपी सिंग
निवृत्त होण्यापूर्वीच ही संधी मिळाली- ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना हवाई दल प्रमुख म्हणाले, “हे एक हायटेक युद्ध होते. ८० ते ९० तासांच्या युद्धात आम्ही खूप नुकसान करू शकलो. त्यामुळे हे युद्ध सुरू ठेवलं तर त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, हे पाकिस्तान स्पष्ट झालं. म्हणून त्यांनी (पाकिस्तान) आमच्या (भारताच्या) डीजीएमओ यांना बोलण्याची इच्छा असल्याचा संदेश पाठवला. आम्ही त्यांचा संदेश स्वीकारला. एके दिवशी आम्हाला हवाई दलात असताना तिथे जाण्याची संधी मिळेल. अशा दिवसांचे स्वप्न पाहत आम्ही मोठे झालो आहोत. योगायोगाने मला निवृत्त होण्यापूर्वीच ही संधी मिळाली. आम्ही तिथले एअरफील्ड ताब्यात घेतले होते”.
पूर्ण स्वातंत्र्य होतं- “राजकीय इच्छाशक्ती हे एक यशाचं कारण आहे. आम्हाला अतिशय स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आमच्यावर कोणतेही बंधने लादण्यात आली नव्हती. आम्ही किती दूर जायचं हे निश्चित केलं. आम्हाला नियोजन करणं आणि ते अमलात आणण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. आम्ही हल्ले विचारपूर्वक केले होते. तिन्ही सेवांमध्ये समन्वय होता. सीडीएस आम्हाला एकत्र आणण्यासाठी होते. एनएसएनं सर्व एजन्सींना एकत्र आणण्यातही मोठी भूमिका बजावली,” असे ते म्हणाले.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर- पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचा बळी घेतल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर मोहिम आखली. यामध्ये भारतीय हवाई दलाचे हल्ले केवळ हवाई हल्ल्यापुरते मर्यादित नव्हते. भोलारी आणि रहीम यार खान सारख्या प्रमुख पाकिस्तानी हवाई तळांसह जमिनीवरील लक्ष्यांवर अचूक शस्त्रास्त्रे टाकण्यात आली. उपग्रह प्रतिमा, स्थानिक माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक इंटरसेप्ट्समधून मिळालेल्या गुप्तचर माहितीमुळे हवाई दलाला दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा आणि पाकिस्तानच्या सैन्यदलाचं नुकसान करणं शक्य झालं.

