भंडारजचे तिन्ही सुपुत्र देशसेवेस सज्ज; सैन्य व सीआरपीएफमध्ये निवडीबद्दल उत्स्फूर्त सत्कार

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
भंडारज गावातील तीन होतकरू युवकांची भारतीय संरक्षण दलांमध्ये झालेली निवड हा केवळ त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, निवड झालेल्या युवकांचा घरी जाऊन शाल व श्रीफळ देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
प्रतिक रमेश निमकाळे (CISF), सर्वेश सतिश बाभुळकर (CRPF) आणि सुमित हरिभाऊ बहिरे (CRPF) या तीन युवकांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि देशसेवेची प्रखर भावना यांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत आमदार गजानन लवटे यांनी स्वतः उपस्थित राहून त्यांच्या शुभहस्ते सत्कार केला. यावेळी युवकांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देत त्यांनी देशसेवा ही केवळ नोकरी नसून राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य आहे, असे सांगून त्यांच्या धैर्य, शिस्त आणि समर्पणभावनेचे कौतुक केले.
या तिन्ही युवकांच्या यशामुळे भंडारज गावासह संपूर्ण अंजनगाव सुर्जी तालुक्याचा मान उंचावला आहे. ग्रामीण भागातील तरुणांनीही मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी चिकाटीने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. त्यांच्या यशामुळे इतर युवकांमध्येही सैन्य व अर्धसैनिक दलांत भरती होण्याची प्रेरणा निर्माण होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
सत्कार सोहळ्यावेळी महेंद्र दिप्टे, रमेश निमकाळे, हरिभाऊ बहिरे, गोपाल बाभुळकर, सतिश बाभुळकर यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. ग्रामस्थांनीही या तिन्ही युवकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी सेवेसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

