महाराष्ट्र

रस्ता सुरक्षेसाठी आयआयटी मद्रासचे तांत्रिक मार्गदर्शन; अमरावतीत प्रशासनाची प्रभावी कार्यशाळा

अमरावती (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा व्यवस्थेला अधिक सक्षम बनविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून आयआयटी मद्रासच्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रोड सेफ्टी (CoERS) यांच्या सहकार्याने ‘डीडीएचआय’ (DDHI) उपक्रमांतर्गत विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नियोजन भवन येथे पार पडलेल्या या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात विविध शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणामध्ये रस्ता सुरक्षेसंदर्भातील आधुनिक तांत्रिक उपाययोजना, अपघातांची कारणमीमांसा, धोकादायक ठिकाणांची ओळख, त्यांचे दस्तऐवजीकरण तसेच त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आयआयटी मद्रासचे प्रमुख प्रकल्प अधिकारी डॉ. रोशन जोस आणि प्रकल्प अभियंता प्रदीप कुमार एनव्हीके यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण देत विविध डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर विवेचन केले.

 

प्रशिक्षणादरम्यान डीडीएचआय आणि एफपीएस ॲप्लिकेशनचा वापर, रस्त्यांवरील जोखमीची ठिकाणे ओळखण्याची प्रक्रिया, संबंधित विभागांमधील समन्वय, अहवाल सादरीकरणाची कार्यपद्धती तसेच अपघातग्रस्तांना सुवर्णक्षणात (Golden Hour) तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रॉमा केअर आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला.

 

या कार्यशाळेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर. वाय. पाटील, कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी यांच्यासह पोलीस, परिवहन, रस्ते विकास आणि आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणाद्वारे विविध विभागांमध्ये समन्वय वाढवून रस्ता सुरक्षा व्यवस्थेला अधिक परिणामकारक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

अमरावती जिल्ह्यातील रस्ते अधिक सुरक्षित, अपघातमुक्त आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्ता सुरक्षेबाबत अधिक परिणामकारक उपाययोजना राबविण्यास या उपक्रमामुळे चालना मिळेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.