ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

महाराष्ट्रात लहान मधुमेही मुलांसाठी मोफत इन्सुलिन देणारं अमरावतीत एकमेव केंद्र

डायबिटीस असोसिएशन ऑफ अमरावती यांच्या प्रयत्नानं दोन वर्षांपासून सुरू झालेल्या ह्या उपक्रमासंदर्भात "खरा संवाद"चा हा स्पेशल रिपोर्ट.

अमरावती- मधुमेहासारख्या गंभीर आजारानं ग्रस्त असलेल्या लहान मुलांसाठी महाराष्ट्रात मोफत इन्सुलिन देणारं एकमेव केंद्र अमरावतीत कार्यरत आहे. गरीब कुटुंबातील मधुमेही बालकांसाठी हा उपक्रम अक्षरशः जीवनदायी ठरत असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शुक्रवारी मोफत इन्सुलिन, तपासणी आणि तज्ज्ञ मार्गदर्शन दिलं जातंय. डायबिटीस असोसिएशन ऑफ अमरावती यांच्या प्रयत्नानं दोन वर्षांपासून सुरू झालेल्या ह्या उपक्रमासंदर्भात “खरा संवाद”चा हा स्पेशल रिपोर्ट.

लहान मुलांमधील मधुमेह ही वाढती गंभीरता : आज लहान वयातील मुलांमध्येही मधुमेहाचं प्रमाण वाढत आहे. या मुलांमध्ये प्रामुख्यानं टाईप वन मधुमेह आढळतो. ज्यामध्ये शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. हा ऑटो इम्युन आजार असून, शरीर स्वतःच्या पेशींवर हल्ला करतं. त्यामुळं या मुलांना गोळ्या उपयोगी पडत नाहीत आणि त्यांना आयुष्यभर इन्सुलिन इंजेक्शन घ्यावं लागतं, अशी माहिती अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी खास लहान मुलांसाठी सुरू असलेल्या केंद्रात सेवा देणारे बाल मधुमेह तज्ज्ञ डॉ. भूषण थोरात यांनी “ईटीव्ही भारत”शी बोलताना दिली. या प्रकारात शरीरातील इन्सुलिन तयार करणारी यंत्रणा पूर्णपणे बंद होते. त्यामुळं मुलांना इंजेक्शनद्वारे इन्सुलिन द्यावी लागते. पोटावाटे औषध दिल्यास ते पचून जातं, त्यामुळे इंजेक्शन हा एकमेव पर्याय आहे, असेदेखील डॉ. भूषण थोरात म्हणाले.

 

मधुमेह सायलेंट पण घातक आजार : मधुमेह हा केवळ रक्तातील साखर वाढण्यापुरता मर्यादित नसून तो अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरतो. हृदयरोग, किडनी निकामी होणे, डोळ्यांचे आजार, नसांचं नुकसान यांसारख्या गुंतागुंती मधुमेहामुळे निर्माण होतात. त्यामुळं हा आजार सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. उपचार सुरू असतानाही अनेक रुग्णांना हायपर टेन्शन, हार्ट प्रॉब्लेम किडनी डॅमेज आणि डायबिटीस फूट यांसारख्या समस्या उद्भवतात, असं डॉ. भूषण थोरात म्हणाले.

 

गरिबांसाठी दिलासा ठरलेली योजना : इन्सुलिनचा खर्च अनेक गरीब कुटुंबांना परवडत नाही. यामुळं अनेक मुलांचे उपचार अपूर्ण राहतात. ही समस्या लक्षात घेऊन अमरावतीत मोफत इन्सुलिन वितरणाचा उपक्रम सुरू करण्यात आला. राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांच्या माध्यमातून डायबिटीज असोसिएशन ऑफ अमरावती, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय यांच्या सहकार्याने 2024 पासून हे विशेष केंद्र सुरू झालंय. अमरावतीचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विद्यमान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोलाचं सहकार्य या कामासाठी लाभलं, असं राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी “खरा संवाद”शी बोलताना सांगितलं.

 

डायबिटीज असोसिएशनचा प्रवास : अमरावतीत 1996, 97 मध्ये डायबिटीज असोसिएशन ऑफ अमरावतीची स्थापना झाली, यासाठी राजेश पिदडी या व्यक्तीनं खास पुढाकार घेतला. विशेष म्हणजे राजेश पिदडी यांना वयाच्या 12 व्या वर्षांपासून मधुमेह आहे. त्यांच्या पुढाकारातूनच डायबिटीज असोसिएशन ऑफ अमरावतीची स्थापना झाली. या संस्थेचे पहिले अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे होते. तेव्हापासून आजपर्यंत डॉ. मिलिंद जगताप, राजेश पिदडी यांसारख्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने काम करत रुग्णांना मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध करून दिलेत. सध्या शहरातील मधुमेहतज्ज्ञ डॉ. अजय डफळे यांच्या अध्यक्षतेत ही संस्था वाटचाल करीत आहे.

2024 पासून मोफत इन्सुलिन योजना : टाईप वन मधुमेह असलेल्या मुलांसाठी इन्सुलिन अत्यावश्यक आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत 2024 पासून मोफत इन्सुलिन योजना सुरू केली. आज जिल्ह्यातील अनेक मुलांना याचा फायदा होतोय, असं राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे म्हणालेत. या केंद्रामुळे मुलांमध्ये कोमा किंवा गंभीर गुंतागुंतीचे प्रमाण कमी झाले असून, त्यांची वाढ ही चांगली होत आहे. अनेक मुलं आता शिक्षण घेत आहेत आणि सामान्य आयुष्यात जगत आहेत. अनेकांची लग्नदेखील झाली, त्यांना मुलं-बाळं पण आहेत, असं डॉ. अनिल बोंडे म्हणालेत. या केंद्रात केवळ इन्सुलिनच नाही तर डोळ्यांची रेटिना तपासणी, किडनी तपासणी, साखर नियंत्रण मार्गदर्शन केलं जातं, असंदेखील डॉ. अनिल बोंडे यांनी स्पष्ट केलंय.

 

लवकरच मोबाईल तपासणी युनिट : मधुमेहामुळं अंधत्वाचा धोका मोठा असतो. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात लवकरच प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचून मधुमेही रुग्णांची तपासणी करण्याकरिता एक मोबाईल बसची सुविधा सुरू होईल, असं डॉक्टर अनिल बोंडे म्हणालेत. या उपक्रमासाठी सीएसआर फंड उपलब्ध करून देण्याबाबत काही कंपन्या संपर्कातदेखील आहेत. ही मोबाईल बस सुरू झाली की महिनाभर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना उपचार मिळण्यास मदत होईल, असंदेखील डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितलंय.

या केंद्रामुळं रुग्णांना मिळते नवी आशा : या केंद्रामुळे अनेक रुग्णांचं जीवन बदललंय. या केंद्रात येऊन मला आत्मविश्वास मिळाला. माझ्यापेक्षा लहान मुलांना पाहून मी ही सामान्य आयुष्य जगू शकते याची जाणीव झाली, असं गायत्री पापडघाटे या तरुणींनं “खरा संवाद” शी बोलताना सांगितलं. माझ्या मुलाला इथं मोफत इन्सुलिन आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळालं. त्यामुळं मोठा दिलासा मिळतोय, असं बाल मधुमेही रुग्णाचे पालक भारत तायडे “ईटीव्ही भारत”ला म्हणाले. वैभव पवार या तरुणांना चार वर्षांपूर्वी मला मधुमेह झाला. आता या केंद्रामुळे माझी साखर नियंत्रणात आहे, असं “खरा संवाद” ला सांगितलं.

राजेश पिदडी या व्यक्तीचा प्रेरणादायी अनुभव : डायबिटीज असोसिएशन ऑफ अमरावतीचे सचिव असणारे राजेश पिदडी हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले. 1976 पासून ते इन्सुलिनवर आहेत. इन्सुलिन हा एकमेव उपाय आहे. योग्य पद्धतीने इंजेक्शन घेणं, वेळेवर आहार आणि साखरेची तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे, असं राजेश पिदडी “ईटीव्ही भारत” शी बोलताना म्हणाले. साखर 70 खाली गेल्यास हायपोग्लायसेनिया होऊ शकतो. त्यामुळं रुग्णांनी नेमकी गोड पदार्थ जवळ ठेवावीत. आजच्या आधुनिक इन्सुलिन पेनमुळं उपचार सोपे झाले आहेत. योग्य नियंत्रण ठेवल्यास मधुमेहग्रस्त रुग्ण पूर्णपणे सामान्य आयुष्य जगू शकतो, असं राजेश पिदडी यांनी सांगितलं.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.