मुळा नदीवरील आंबित धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो; अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले धरण भरले – AMBIT DAM
गेल्या आठवड्यापासून अकोले तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढला आहे. घाटमाथा आणि मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाच्या संततधारांमुळे नदीपात्र भरून वाहू लागले आहे.

अहिल्यानगर- अकोले तालुक्यातील मुळा नदीच्या उगमाजवळ असलेले आंबित धरण आज मे महिन्यातच ओव्हरफ्लो झाले आहे. मुळा नदीवरील हे धरण साधारणतः जून महिन्यात भरते. मात्र यावर्षी पावसाने वेळेआधीच दमदार हजेरी लावल्याने आंबित धरण मे अखेरीसच भरले आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील यंदाच्या वर्षीचे पहिले भरलेले धरण ठरले आहे.
मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाच्या संततधारांमुळे नदीपात्र भरले : गेल्या आठवड्यापासून अकोले तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढला आहे. घाटमाथा आणि मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाच्या संततधारांमुळे नदीपात्र भरून वाहू लागले आहे. विशेषतः मुळा नदीच्या उगमाजवळील भागात आंबित गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान नोंदवले गेले. यामुळे आंबित धरणाच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढून आज दुपारी ते ओसंडून वाहू लागले. आंबित धरणाची पाणीसाठवण क्षमता सुमारे 193.97 दशलक्ष घनफूट आहे.
धरणाच्या पातळीत लक्षणीय वाढ : धरण भरताच त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले असून, मुळा नदीचा प्रवाह पुढे झेपावलाय. या प्रवाहामुळे मुळा नदी पुन्हा एकदा सजीव झाली असून, पुढे हा प्रवाह पिंपळगाव खांड धरणात स्थिरावण्याची शक्यता आहे. पावसामुळे संपूर्ण मुळा पाणलोट क्षेत्रात नद्या आणि नाले वाहू लागले आहेत. सध्या भंडारदरा धरणातही नव्याने पाण्याची आवक सुरू झाली असून, या धरणाच्या पातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी 2024 मध्ये आंबित धरण 28 जून रोजी भरले होते. मात्र यंदा अवघ्या मे महिन्यातच धरण भरल्यामुळे एक महिना अगोदर पाणीसाठा पूर्ण झाल्याचे दिसून येते.

