ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

बोगस रेशन कार्डाच्या विरोधात राज्य सरकारकडून कारवाईची मोहीम, आतापर्यंत किती जणांवर कारवाई?

धान्याचा अनेकांकडून गैरफायदा घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्यामुळं सरकारने बोगस रेशन कार्डच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

मुंबई : राज्यातील गोरगरीब लोकांना सरकारकडून रेशन कार्डवर धान्य देण्यात येते. मात्र या धान्याचा अनेकांकडून गैरफायदा घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्यामुळं सरकारने बोगस रेशन कार्डच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. ज्यांचे उत्पन्न ५९ हजारांवर आहे आणि जो धान्य घेण्याच्या निकषात बसत नाहीत, असे लोकही धान्य घेताहेत. तसेच त्यांचे उत्पन्न जास्त आहे, पण ते कमी उत्पन्न दाखवून सरकारच्या रेशनच्या धान्याचा लाभ घेत आहेत. याविरोधात आता सरकार आणि अन्न व नागरी पुरवठा विभाग अॅक्शन मोडवर आले आहे.

…तरीही घेतात धान्य : दरम्यान, अनेक श्रीमंत लोक, शिक्षक, गलेलठ्ठ नोकरदार, सरकारी अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, व्यापारी यांच्याकडेसुद्धा पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असल्याचे समोर आले आहे. तर ही लोक मोफत धान्य याचा लाभ घेत आहेत. या धान्यात गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ असे धान्य महिन्याला वरील लोक उचलतात, मात्र जे खरोखरंच गरजू आहेत, ते मात्र या धान्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळं जे चुकीच्या पद्धतीने याचा लाभ घेताहेत, त्यांच्यावर आता सरकारने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. ही कारवाईची प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागातील प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी “ईटीव्ही भारत”ला दिली आहे.

ई-केवायसी नसल्यामुळं १८ लाख रेशन कार्ड रद्द : दुसरीकडे राज्यात ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत, त्यांनी ई-केवायसी करण्याचे राज्य सरकारने म्हटले होते. त्यामुळं ज्या रेशन कार्डधारकांनी ई-केवायसी केले नाहीत, अशा १८ लाख रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहे. तर दीड कोटींहून अधिक रेशन कार्डधारकांची ई-केवायसी बाकी आहे. आधार लिंकसाठी केंद्र सरकारच्या ई-केवायसी मोहिमेत राज्यातील १८ लाख रेशन कार्ड रद्द झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिली आहे.

बांगलादेशी नागरिकांना दणका : बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन आणि बोगस कागदपत्र बनवून किंवा पैसे देऊन अनेक बांगलादेशी नागरिकांनी बनावट रेशन कार्ड बनविले आहे. त्यांची चौकशी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस करताहेत आणि ही माहिती पोलिसांनी जिल्हाधिकारी यांना दिली आहे. त्यामुळं अशा बांगलादेशी नागरिकांचं बोगस रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत. तसेच अजूनही पोलिसांकडून बनावट रेशन कार्डची मोहीम सुरू असून, जे कोणी दोषी सापडतील त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल, अशीही माहिती समोर येत आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.