अमरावती जिल्हा प्रशासनाच्या पुनर्रचनेची नांदी; अचलपूरला प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयामुळे नागरिकांना दिलासा

अमरावती (जिल्हा प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून अचलपूर येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणला आहे. या प्रस्तावामुळे विशेषतः जिल्ह्याच्या उत्तरेकडील आणि मेळघाट पट्ट्यातील नागरिकांना विविध महसुली व प्रशासकीय कामांसाठी होणारी धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या अनेक शासकीय कामांसाठी दुर्गम भागातील नागरिकांना अमरावतीपर्यंत प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ, आर्थिक खर्च आणि प्रशासकीय प्रक्रियेत होणारा विलंब या समस्यांना सामोरे जावे लागते. प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयामुळे या अडचणींवर मोठ्या प्रमाणात मात करता येणार असून प्रशासनाचे विकेंद्रीकरण अधिक प्रभावीपणे राबविता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रस्तावित कार्यक्षेत्रानुसार अचलपूर येथे उभारण्यात येणाऱ्या या कार्यालयाच्या अखत्यारीत अचलपूर, चांदूर बाजार, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा आणि धारणी या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेषतः मेळघाटातील आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांसाठी ही व्यवस्था अधिक सोयीची ठरणार असल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे, अमरावती येथील मुख्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अमरावती शहर व ग्रामीण, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरुड, तिवसा आणि भातकुली हे तालुके कायम राहणार आहेत. या विभागणीमुळे प्रशासकीय जबाबदाऱ्यांचे संतुलित वितरण होऊन निर्णयप्रक्रिया अधिक परिणामकारक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रस्तावित कार्यक्षेत्राबाबत नागरिकांना आपली मते, सूचना किंवा हरकती नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. संबंधित अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करता येणार आहेत. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्याच्या प्रशासकीय इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रस्तावाकडे आता सर्वसामान्य नागरिकांसह विविध सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय घटकांचे लक्ष लागले असून अंतिम निर्णयानंतर जिल्ह्याच्या कारभाराला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

