ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचा राजीनामा; म्हणाले, कोल्हापूरची शिवसेना गेली पाच वर्षे काँग्रेसच चालवतेय..

निवडणुकीत आणि जनसंपर्कात एकट्याने लढत राहणं अवघड झालं असून, पक्षांतर्गत सहकार्याचा अभाव हीच मुख्य अडचण आहे.

 

 

कोल्हापूर – कोल्हापुरात शिवसेना (ठाकरे)च्या संघटनात्मक घडामोडींना नवं वळण मिळालं असून, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पदाचा दिलेला राजीनामा यामुळे पक्षातील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इंगवले यांनी राजीनाम्याच्या पत्रात कोणतंही स्पष्ट कारण नोंदवलं नसलं तरी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी “एकट्याने किती खिंड लढवायची?” असा सवाल उपस्थित करत कामाचा ताण, एकाकीपणा आणि मानसिक थकवा यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षातील कोल्हापुरातील घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

कोल्हापूरमध्ये ठाकरे शिवसेनेत आधीपासूनच नेत्यांमधील मतभेद, नाराजी आणि नियुक्त्यांवरून असंतोष होता. इंगवले हे कोल्हापुरातील ठाकरे शिवसेनेचे सक्रिय आणि जुने पदाधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी दोनवेळा कोल्हापूर शहरप्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर मागील वर्षीच त्यांच्या जिल्हाप्रमुख नियुक्तीवरून उपनेते संजय पवार, हर्षल सुर्वे आणि इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया चर्चेत आल्या होत्या; काहींनी इंगवलेंबाबतच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता, तर काहींनी राजीनाम्याचा मार्ग स्वीकारला. तर गेल्या काही दिवसांपासून इंगवले यांच्या भूमिकांबाबत आणि स्थानिक पक्षीय समन्वयाबाबत तर्कवितर्क सुरू होते. काही दिवसांपूर्वीच रविकिरण इंगवले आणि शहरप्रमुख मंजीत माने यांच्या नावाने व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमुळेही वातावरण तापलं होतं. त्यामुळे इंगवले यांच्या राजीनाम्याकडे केवळ वैयक्तिक निर्णय म्हणून न पाहता, सुरू असलेल्या संघटनात्मक तणावाचा पुढचा टप्पा म्हणून पाहिलं जात आहे.

राजीनाम्यामागे नेमका काय सूर? – इंगवले यांनी सांगितलं, “मी शिवसेना पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही, केवळ जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.” रविकिरण इंगवले सध्या मानसिकदृष्ट्या सक्रिय राजकारणात राहण्याच्या स्थितीत नसल्याचं सांगत आहेत. “एकटा फॉरवर्ड म्हणून किती खेळायचं” आणि “माझी आता डिफेन्समध्ये जायची इच्छा आहे” अशा उपमा देत त्यांनी स्वतःवरील कामाचा ताण, सततचे आरोप-प्रत्यारोप आणि एकट्याने पक्षाचं काम चालवल्याची भावना मांडली. त्यांनी कोणावर वैयक्तिक नाराजी नसल्याचं सांगितलं असलं तरी, कुणीही आपल्या बाबतीत चुकीचं वक्तव्य केल्यास तीव्र प्रतिक्रिया देऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

 

काय म्हणाले रविकिरण इंगवले – इंगवले यांनी बोलताना, “कोल्हापूरची शिवसेना काँग्रेसने चालवली आहे. ही सत्यताच आहे. पदरचे पैसे घालून लढणारा मी कोल्हापूर शहरातला एकमेव शिवसैनिक आहे, कोणी कोणी निवडणुका लढवल्या..? निवडणुका न लढवता मैदानातून कोण कोण पळून गेले?” अशी नाव न घेता टीका केली. या टीकेच्या प्रतिक्रियांमधून त्यांनी स्थानिक राजकारणातल्या सत्ता समीकरणांवरही बोट ठेवलं आहे. त्यांच्या मते, निवडणुकीत आणि जनसंपर्कात एकट्याने लढत राहणं अवघड झालं असून, पक्षांतर्गत सहकार्याचा अभाव हीच मुख्य अडचण आहे. स्थानिक पातळीवर ठाकरे शिवसेनेची संघटनात्मक ताकद कमी पडत असल्याची चर्चा याआधीही माध्यमांतून झाली आहे. त्यामुळे या राजीनाम्यामुळे आगामी काळात पक्षात आणखी फेरबदल किंवा नव्या नियुक्तींची शक्यता वाढली आहे.

 

 

शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पदाचा राजीनामा दिला असून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे यापुढे ते पक्षात राहणार की नाही, तसंच त्यांच्याजागी कोल्हापूर जिल्ह्याची सूत्रं कोण सांभाळणार? हा प्रश्न सध्या महत्त्वाचा बनला आहे. स्थानिक पातळीवर या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, वरिष्ठ नेतृत्व पुढील तोडगा कसा काढेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.