महत्वाचे

“पुण्यातील सोन्याचा नांगर” देखाव्यासाठी सारिका ज्ञानदेव धामोळे यांना अमरावती जिल्ह्यात द्वितीय क्रमांक

चांदुर बाजार: शहरातील जगदंब पब्लिक स्कूल, बेलोरा रोड येथे आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवराय युवा विचार कृती संमेलन’ मोठ्या उत्साहात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करून तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती, संघटनशक्ती आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवप्रेमी व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात शिवग्रंथदिंडीने करण्यात आली. त्यानंतर झालेल्या उद्घाटन समारंभात अध्यक्ष म्हणून प्रा. प्रेमकुमार बोके (विचारवंत व वक्ते, अंजनगाव सुर्जी) उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रा. प्रविणदादा देशमुख (सुप्रसिद्ध वक्ते, यवतमाळ) यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी संमेलनाध्यक्ष कपिल ढोके (सुप्रसिद्ध युवा वक्ते, अकोला), सीमाताई बोके (प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड), उल्हासजी राठोड (सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चांदूर बाजार) तसेच निखील काटोलकर (चांदूर बाजार) यांची प्रमुख उपस्थिती होती.

संमेलनात “छत्रपती शिवरायांच्या धर्मनिरपेक्ष विचार व आजचे महाराष्ट्र” या विषयावर शिवसंवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात मान्यवर वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट करत तरुणांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही पार पडला. ही स्पर्धा डॉ. तुषार उ. देशमुख यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेचे अकरावे वर्ष होते.

या स्पर्धेत सारिका ज्ञानदेव धामोळे यांनी सादर केलेल्या “पुण्यातील सोन्याचा नांगर” या ऐतिहासिक देखाव्यास अमरावती जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या सादरीकरणातील ऐतिहासिक वेशभूषा आणि सजीव देखाव्यामुळे उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.

या देखाव्यात मासाहेब जिजाऊंच्या वेशभूषेत सारिका ज्ञानदेव धामोळे, बाल शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत नूतन ज्ञानदेव धामोळे, केसरबाईच्या वेशभूषेत अन्नपूर्णा आजी, तर मावळ्यांच्या वेशभूषेत परी ज्ञानदेव धामोळे व स्नेहा गोविंदराव गुजर यांनी भूमिका साकारल्या.

या सादरीकरणासाठी ज्ञानदेव धामोळे व राजकुमार भाऊ रंगारी यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, विविध सामाजिक संघटना तसेच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि इतिहासाची प्रेरणा तरुणांपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद ठरवला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.