डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाविरोधात नगरसेवक सुयोग खाडे आक्रमक
प्रभाग क्रमांक २ मध्ये तातडीने फवारणीची मागणी”

–सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक सुयोग उत्तमराव खाडे यांनी नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
नगरसेवक सुयोग खाडे यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रभाग क्रमांक २ मधील अनेक भागांमध्ये अस्वच्छतेची समस्या निर्माण झाल्याचे नमूद केले आहे. सहारा नगर, शिवाजी नगर, अंबिका नगर, पुर्वा नगर, गणपती नगर, चिंतामणी नगर, तंवर नगर, शिक्षक कॉलनी, गणेश नगर, केशव नगर, अण्णाभाऊ साठे नगर, संगई प्लॉट, सिव्हील लाईन, रुपलाल नगर, झांझनपुरा तसेच मार्केट लाईन परिसरातील नविन बसस्थानक, स्टेट बँक परिसर, लेंधे कॉम्प्लेक्स आणि संगई शाळा नाका या भागांमध्ये उघड्या नाल्या व साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
नगरसेवक सुयोग खाडे यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी नाल्यांची योग्य व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी उघड्यावर वाहत असून ते ठिकठिकाणी साचून राहते. त्यामुळे परिसरात डासांची संख्या वाढली असून नागरिकांना ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यासंदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याचे सांगत नगरसेवक सुयोग खाडे यांनी नगर परिषद प्रशासनाने तातडीने मच्छर प्रतिबंधक औषधांची फवारणी करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी केली आहे. तसेच केवळ प्रभाग क्रमांक २ पुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण शहरात नियमित फवारणी मोहीम राबविण्याची गरज असल्याचेही सुयोग खाडे यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, शहरातील स्वच्छता, नाल्यांची साफसफाई आणि डास प्रतिबंधक उपाययोजनांबाबत प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत नगरसेवक सुयोग खाडे यांनी मांडले असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

