मद्यधुंद व्यापाऱ्याचा बेदरकारपणा; माकोडे कुटुंबांचा आधार हिरावला
एअर बॅग खुलल्या : माकोडेंचा पाय धडावेगळा, परस्परांशेजारी बापलेकीचे अंत्यसंस्कार

अमरावती : एका मद्यधुंद व्यापारी कारचालकाच्या अंगात संचारलेल्या वेगाच्या राक्षसाने माकोडे कुटुंबाची स्वप्ने धुळीस मिळवली. रविवारी मध्यरात्री एमआयडीसी चौकात झालेल्या भीषण अपघातात, २४ वर्षीय अभियंता तरुणी सपना आणि तिचे वडील गजानन माकोडे (५२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सपनाची धाकटी बहीण प्रियांका सध्या खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
माहितीनुसार, सपना ही पुण्यात एका नामांकित कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. काही दिवसांपूर्वीच ती मायानगर येथील आपल्या घरी आली होती. रविवारी रात्री १२:०५ च्या सुमारास वडील गजानन हे सपना आणि प्रियांका या दोन्ही मुलींना दुचाकीने ट्रॅव्हल्स स्टेंडकडे घेऊन जात होते. सोबतच दुसऱ्या दुचाकीवर माकोडे यांचे साडू मुकेश रावेकर हेदेखील परिवारासह होते. मात्र, काळाने वाटेतच घाला घातला. सोमवारी पहाटे यात गुन्हा दाखल करण्यात आला. एकाचवेळी सपना व गजानन यांचे मृतदेह मायानगर येथील घरी आणताच त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.
अपघातावेळी आरोपीने एकटाच असल्याचे सांगितले असले तरी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. त्याने दारू कुठे प्राशन केली, याचाही शोध घेतला जाईल.
पुनित कुलट, ठाणेदार, राजापेठ
मायानगरात स्मशान शांतता अन् हळहळ धडक बसताच कारच्या दोन्ही एअरबॅग्स उघडल्या, ज्यामुळे आरोपी मनीष बचावला. मात्र, जखमींना मदत करण्याऐवजी तो अपघातस्थळावरून पळून गेला. वैद्यकीय तपासणीत आरोपी मनीष हा पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दुपारी १२.३० च्या सुमारास दोघांचेही शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही पार्थिव मायानगरात नेण्यात आले. तेथील वातावरण अत्यंत हृद्यद्रावक होते.
लगतच्या दोन ओट्यांवर बाप-लेकीचा अंत्यसंस्कार सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास स्थानिक हिंदू स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात गजानन आणि सपना यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेजारी-शेजारी जळणाऱ्या त्या दोन चिता पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. एकीकडे अंत्यसंस्कार सुरू असताना, दुसरीकडे त्यांची दुसरी मुलगी प्रियांका अतिदक्षता विभागात जीवन-मरणाची लढाई लढत आहे. एका गरिबाच्या घरची लेक मोठी स्वप्ने उराशी बाळगून घराबाहेर पडली होती, पण एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या नशेखोर प्रवृत्तीने तिचे आयुष्य आणि वडिलांचे छत्र कायमचे हिरावून घेतले.

