आरोग्यताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत करोनाचे एकूण आठ रूग्ण, दोन करोना बाधित रुग्णांचा मृत्यू

कल्याण : मागील सहा दिवसांच्या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील करोना साथीने बधित रूग्णांची एकूण संख्या आठ झाली आहे. सहव्याधी असलेल्या दोन करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एक बाधित रुग्ण घरात विलगीकरणात ठेवण्यात आला आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

बुधवारी दिवसभरात पालिका हद्दीत एक करोना साथीचा रुग्ण आढळून आला आहे. त्याच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. दोन बाधित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. घरात विलगीकरणात असलेल्या करोना बाधित रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

गेल्या आठवड्यात गुरूवारी करोना साथीने बाधित एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला होता. बुधवारी अन्य एका करोनाची बाधा झालेल्या रूग्णाचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीतील ६७ वर्षाची एक व्यक्ति प्रकृती ठीक नसल्याने डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. डाॅक्टरांनी या रुग्णाच्या विविध वैद्यकीय तपासण्या केल्या. त्यात त्यांना संशय आढळला. म्हणून या रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्या चाचणीत हा रुग्ण करोना बाधित असल्याचे आढळून आले.

या रुग्णाला तातडीने प्रभावी उपचार मिळावेत म्हणून त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात हलविण्यात आले. या रुग्णाला उच्चरक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. तसेच बारा वर्षापूर्वी या रुग्णाला पक्षघाताचा झटकाही आला होता.

या सहव्याधी असलेल्या करोना बाधित रुग्णावर कळवा येथील रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. बुधवारी उपाचर सुरू असताना या सहव्याधीग्रस्त करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाने करोना प्रतिबंधित लस घेतली नसल्याचे तपासणीत निष्पन्न झाले, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल यांनी सांगितले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.