महत्वाचे

विहिगाव मार्गाची दुर्दशा : उपोषणानंतर दहा दिवसांत दुरुस्तीचे आश्वासन

– प्रतिनिधी अंजनगाव सुर्जी :  विहिगाव फाटा ते विहिगाव दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता” अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः पावसाळ्यात या मार्गाची अवस्था अधिकच धोकादायक बनते, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत होती.
या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार फिरोज कुरेशी तसेच सामाजिक कार्यकर्ते भगवान अभ्यंकर यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. त्यांच्या या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.
दरम्यान, अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे यांनी उपोषण स्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी दहा दिवसांच्या आत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर फिरोज कुरेशी यांनी उपोषण मागे घेत आंदोलन स्थगित केले.
या प्रसंगी विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी प्रशासनाने दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली असून, प्रत्यक्षात काम सुरू होऊन पूर्ण होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.