महाराष्ट्र

मेळघाटाच्या विकासासाठी प्रशासनाने झटावे; आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर भर

धारणीतील आढावा बैठकीत मंत्री डॉ. अशोक उईके यांचे स्पष्ट निर्देश

जिल्हा प्रतिनिधी अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाट परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनातील प्रत्येक विभागाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. धारणी येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत नागरिकांच्या मूलभूत अडचणी तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले.
मेळघाटातील कुपोषण, सिकलसेल, थॅलेसेमिया आणि क्षयरोग यांसारख्या गंभीर समस्यांवर यावेळी विशेष चर्चा करण्यात आली. आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढविणे, रिक्त वैद्यकीय पदे भरणे आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे मंत्री डॉ. उईके यांनी नमूद केले. पावसाळ्यापूर्वी कुपोषणमुक्तीच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देत त्यांनी प्रशासनाला अधिक संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन केले.
बैठकीत आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या योजना पारदर्शकपणे पोहोचल्या पाहिजेत, यावरही भर देण्यात आला. विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच लाभार्थ्यांच्या याद्या प्रकल्प कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर स्पष्टपणे प्रसिद्ध करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भूमिका मंत्री महोदयांनी मांडली.
शेतीविकासाच्या दृष्टीने बिरसा मुंडा कृषी योजनेंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना विहिरींसह सोलार यंत्रणा, पाईपलाईन, स्प्रिंकलर आणि मोटार पंप उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सकारात्मक निर्देश दिले. यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचन क्षमतेत वाढ होऊन उत्पादनक्षमतेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आश्रमशाळांतील मूलभूत सुविधांचाही आढावा घेण्यात आला. खारी आश्रमशाळेत कमी दाबाच्या विजेमुळे निर्माण झालेल्या समस्येवर स्वतंत्र डीपी बसविण्याच्या सूचना महावितरण विभागाला देण्यात आल्या. तसेच तारूबांदा गावात वाढीव वीज पोल तातडीने उभारण्याचे आदेशही बैठकीत देण्यात आले.
रायपूर येथील आश्रमशाळेकडे जाणाऱ्या रस्त्याला प्रशासकीय मान्यता देऊन काम तातडीने सुरू करण्याची मागणीही बैठकीत पुढे आली. आगामी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी सर्व आश्रमशाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे निर्देश मंत्री डॉ. उईके यांनी दिले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक गावात स्मशानभूमी आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी पक्का जोडरस्ता उभारण्यावरही त्यांनी भर दिला.
या बैठकीला आमदार केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष सुनिल चौथमल, अपर आयुक्त आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीपूर्वी धारणी येथे आदिवासी पारंपरिक संस्कृतीनुसार गदली सुसुन नृत्याद्वारे मंत्री डॉ. उईके यांचे स्वागत करण्यात आले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.