डोंगरदर्यातून उभी राहिलेली जिद्द; सिंधुताईंच्या प्रेरणेनं लीला जांभू बनली स्वतःच्या आयुष्याची शिल्पकार
मेळघाटातील लीला जांभु (Leela Jambhu) यांनी मजुरीतून संघर्ष करत युट्युब-इंस्टाग्रामच्या मदतीनं शिलाई व्यवसाय उभा केला. तसेच त्या ग्रामीण महिलांसाठी प्रेरणा बनल्या आहेत.

अमरावती: लीला जांभू ही सातपुड्याच्या कुशीत, चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या मेळघाटातील पायविहीर गावात राहणारी एक साधी महिला आहे. तिच्याकडं होती फक्त जिद्द, डोळ्यांत स्वतःच्या संसाराला आधार देण्याचं स्वप्न आणि मनात “आपणही काहीतरी करू शकतो” ही ठाम भावना. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करणारी आणि रोजगार हमी योजनेच्या कामावर दिवस काढणारी लीला जांभू (Leela Jambhu) आज स्वतःच्या शिलाई व्यवसायाची मालक बनली आहे.
युट्युब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून शिवणकलेतील बारकावे शिकत लीला जांभू या महिलेनं स्वतःचा मार्ग तयार केला. आज पंचक्रोशीतील महिलांचा तिच्या हातच्या ब्लाऊजवर विश्वास बसला आहे. युट्युबवर तिनं सिंधुताई सपकाळ यांच्यावर आधारित सिनेमा पाहिल्यानंतर तिचं आयुष्यच पालटलं. लीला जांभू यांच्या संघर्षाबाबत `खरा संवाद’चा हा विशेष रिपोर्ट.
मजुरीतून स्वाभिमानाच्या दिशेने प्रवास : मेळघाटातील पायविहीर गावात राहणाऱ्या लीला जांभू यांचं आयुष्य एक वर्षांपूर्वी अत्यंत कठीण होतं. शेतमजुरी, मनरेगाचं काम आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये संसार चालवताना त्यांना स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची ओढ होती. गावातील महिलांसोबत बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी शिवणकलेचा वर्ग सुरू केला. अवघ्या एका महिन्यात त्यांनी शिवणकामाची प्राथमिक माहिती घेतली. त्यानंतर स्वतःच्या जिद्दीवर उभं राहण्याचा निर्धार केला.
तीन किलोमीटरचा पायी प्रवास आणि मोठं स्वप्न : पायविहीर गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बोराळा गावात लीलांनी वर्षभरापूर्वी छोटंसं दुकान भाड्यानं घेतलं. सुरुवातीला त्या रोज पायी चालत दुकानावर जात असत. दिवसातून अनेकवेळा गाव आणि दुकान असा प्रवास करावा लागत होता. मनरेगाच्या कामासाठी फोटो काढण्यासाठी त्यांना पुन्हा गावात जावं लागायचं. या सततच्या धावपळीमुळं त्यांच्या पायांना त्रास होऊ लागला. मात्र, हार मानणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. बचत गटातून कर्ज घेत त्यांनी स्कुटी विकत घेतली. विशेष म्हणजे स्कुटी चालवायलाही त्यांनी स्वतः शिकल्या. आज त्या आत्मविश्वासानं स्कुटीवरून गावातून दुकानावर ये-जा करतात. स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
युट्युब आणि इंस्टाग्राम झाले गुरु: शिवणकलेतील वेगवेगळे डिझाइन्स, ब्लाऊजचे नवे प्रकार, माप घेण्याच्या पद्धती आणि फॅशनमधील बदल हे सर्व लीलांनी युट्युब आणि इंस्टाग्रामवर पाहून शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला वेगवेगळ्या शरीरयष्टीच्या महिलांचं माप कसं घ्यायचं याची, त्यांना भीती वाटायची. मात्र, मोबाईलवरील व्हिडिओ पाहत त्यांनी स्वतःला इतकं सक्षम बनवलं की आज कोणत्याही डिझाइनचा ब्लाऊज त्या आत्मविश्वासाने शिवतात. आज बोराळा, पायविहीर, गंगाझरी, नागापूरसह अनेक गावांतील महिला त्यांच्या दुकानात कपडे शिवण्यासाठी येतात. एवढंच नाही, तर एखाद्या दिवशी दुकान बंद असलं तर महिला इतरत्र न जाता “दुकान बंद का ठेवलं?” अशी विचारणा करतात`खरा संवाद’शी बोलताना सांगितलं.

