ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अंजनगाव सुर्जीमध्ये भीषण अग्नितांडव; वृंदावन दूध डेअरी व नियती सोलर एजन्सी जळून खाक

 

अंजनगाव सुर्जी | प्रतिनिधी  अमरावती जिल्ह्यात ४६ अंशांच्या कडक उन्हाने नागरिक हैराण झाले असताना अंजनगाव सुर्जी शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील डीपी रोडवर दुपारच्या सुमारास भीषण आग लागून दोन दुकाने जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत अंदाजे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात असून व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक कॉलनी परिसरातील डीपी रोडवरील वृंदावन दूध डेअरी या दुकानातील फ्रिजरमध्ये दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. कडक उन्हामुळे निर्माण झालेल्या उष्णतेत काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण दुकानाला वेढा घातला. या आगीने शेजारील नियती सोलर एजन्सी या दुकानालाही कवेत घेतले. परिणामी दोन्ही दुकानांतील साहित्य, उपकरणे, फर्निचर आणि मालसाठा पूर्णपणे जळून खाक झाला.

वृंदावन दूध डेअरीचे मालक यश शेवाळे आणि नियती सोलर एजन्सीचे मालक वैभव पेरकर यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून दोघांचे मिळून अंदाजे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अग्निशामक दल उशिरा पोहोचल्याने नागरिकांमध्ये संताप

आग लागताच दुकानदार व नागरिकांनी नगर प्रशासनाशी संपर्क साधून अग्निशामक वाहन पाठविण्याची मागणी केली. मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचण्यास सुमारे एक तासाचा विलंब झाला. तोपर्यंत आगीने दोन्ही दुकाने पूर्णपणे भस्मसात केली होती.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. “अग्निशामक दल वेळेवर पोहोचले असते तर एवढे मोठे नुकसान टळू शकले असते,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

वाढत्या तापमानामुळे शॉर्टसर्किटच्या घटनांची भीती

सध्या अमरावती जिल्ह्यात तापमानाने ४६ अंशांचा टप्पा ओलांडला असून प्रचंड उष्णतेमुळे विद्युत उपकरणांवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे शॉर्टसर्किटच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या आगीमागेही शॉर्टसर्किट हेच प्राथमिक कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नुकसान भरपाईची मागणी

या भीषण आगीत सर्वस्व गमावलेल्या यश शेवाळे आणि वैभव पेरकर यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

घटनास्थळी आमदार गजानन लवटे, नगरसेवक सुयोग खाडे, नगरसेविका रुपाली सुधीर देवगिरे, नगरसेवक प्रवीण नेमाडे तसेच परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.