संजय राठोड यांची वडाळी तलावाला नवी दिशा; बाळासाहेब ठाकरे स्मारकामुळे अमरावतीला मिळणार जागतिक ओळख

सचिन इंगळे (जिल्हा प्रतिनिधी): अमरावती शहराच्या विकासाला नवे परिमाण देणाऱ्या वडाळी तलाव परिसराच्या सर्वांगीण उभारणीसाठी राज्य शासनाने निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शनिवारी वडाळी तलाव परिसराची पाहणी करत प्रस्तावित ‘वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारका’च्या उभारणीसंदर्भात अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. या प्रस्तावित स्मारकामुळे अमरावतीच्या पर्यटन व सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडणार असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. पाहणीदरम्यान मंत्री राठोड यांनी प्रस्तावित स्मारकाच्या जागेची सविस्तर माहिती घेत परिसरातील विकासकामांचाही आढावा घेतला. हे स्मारक केवळ वास्तू न राहता अमरावतीची ओळख ठरेल, अशा भव्य आणि दिमाखदार स्वरूपात उभारण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शहरातील मुख्य मार्गांवरूनही स्मारक सहजपणे दिसेल, अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वडाळी तलाव परिसराचे सौंदर्यीकरण, पर्यटन विकास, आधुनिक प्रकाश व्यवस्था, नागरिकांसाठी सुविधा आणि पर्यावरणपूरक विकास या सर्व बाबींवर शासन गांभीर्याने काम करीत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. लवकरच शासन स्तरावर उच्चस्तरीय बैठक घेऊन संपूर्ण विकास आराखड्याला अंतिम रूप दिले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली. मंत्री राठोड यांनी विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. वडाळी तलाव परिसर भविष्यात अमरावतीकरांसाठी अभिमानाचे ठिकाण ठरावे तसेच राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये त्याची गणना व्हावी, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. या पाहणी दौऱ्यावेळी विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रस्तावित स्मारक व परिसर विकास आराखड्याबाबत उपस्थितांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, अमरावतीच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

