महाराष्ट्र

घनकचरा व्यवस्थापनात अमरावती जिल्ह्याची मोठी झेप; 26 ग्रामपंचायतींमध्ये आता ई-रिक्षांची घंटागाडी सेवा

अमरावती : ग्रामीण स्वच्छता व्यवस्थेला आधुनिकतेची जोड देत अमरावती जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींमध्ये आता बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षा घंटागाड्या धावणार आहेत. जिल्हा परिषदेमार्फत 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावपातळीवरील घनकचरा संकलन आणि व्यवस्थापन अधिक परिणामकारक होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद परिसरात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ई-रिक्षांना हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागात घराघरातून कचरा संकलन, ओला व सुका कचरा वर्गीकरण आणि त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट यासाठी ही ई-रिक्षा प्रणाली उपयोगी ठरणार आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे प्रदूषणात घट होण्यास मदत होणार असून पारंपरिक इंधनावरील खर्चातही बचत अपेक्षित आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांना गती देतानाच गावांच्या स्वच्छतेचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
पंचायत विभागाच्या प्रशासकीय मान्यतेनंतर या वाहनांची खरेदी करण्यात आली असून प्रत्येकी सुमारे तीन लाख रुपये किंमतीच्या 26 ई-रिक्षांसाठी एकूण 78 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. संबंधित ग्रामपंचायतींना ही वाहने लवकरच सुपूर्द केली जाणार असून ग्रामीण भागात नियमित आणि शिस्तबद्ध कचरा व्यवस्थापन व्यवस्था उभारण्यास त्यामुळे मदत मिळणार आहे.
अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, वरुड, धारणी, धामणगाव रेल्वे आणि चिखलदरा तालुक्यातील निवडक ग्रामपंचायती या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधत आधुनिक व्यवस्थापनाची नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरणार असल्याची भावना कार्यक्रमावेळी व्यक्त करण्यात आली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.