सहाव्या महिन्यातच प्रसूती, डॉक्टरांच्या प्रयत्नाने बाळाला जीवनदान
वजन केवळ ७५० ग्रॅम, ७२ दिवस डफरीनच्या एसएनसीयूमध्ये उपचार

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे मुदतपूर्व जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बाळाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. ७२ दिवसांनी बाळाला सुट्टी झाली
वरूड तालुक्यातील पुसला येथील प्राथमिक केंद्रामध्ये १३ मार्च रोजी कल्पना वरुडकर या गर्भवतीची सहाव्या महिन्यातच नॉर्मल प्रसूती झाली. बाळाला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याला तातडीने डफरीन येथे उपचारासाठी दाखल केले. यावेळी बाळाचे वजन केवळ ७५० ग्रॅम इतकेच होते. त्यामुळे त्याला लगेच बबल सीपीएपीवर ठेवण्यात आले; तसेच बाळाच्या छातीचा एक्स-रे केला असता, त्याला ग्रेड-टू आरडीएस असल्याचे निदान करण्यात आले.तत्काळ त्याच्या फुफ्फुसामध्ये सर्फक्टंट टाकण्यात आले; तब्बल ७२ दिवसाच्या उपचारामुळे अखेर बाळाला नवे जीवनदान मिळाले आहे. रुग्णालयाचे एमएस डॉ. विनोद पवार, एसीएस डॉ. अरुण साळुंके यांच्या मार्गदर्शनात नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. अमोल फाले यांनी बाळावर उपचार केले.

