संत्र्याच्या मृग बहराला यंदाही पुन्हा हुलकावणी

राजुरा बाजार : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदाही अवकाळी पावसाने संत्रा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला. पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. सलग चौथे वर्ष फळाविना वांझोटे जाणार असल्याची भीती खरी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मृग बहराकरिता मार्च, एप्रिल, मेमध्ये पावसाचा ताण असावा, तर जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या कालावधीत संत्रा बागेतील जमिनीमध्ये भरपूर ओलावा आवश्यक आहे. या कालावधीत किमान २०० ते २५० मिमी पाऊस पडलेला असावा. या कालावधीत पाऊस १५० मिमीपेक्षा कमी पडल्यास बहार येण्यामध्ये अडचणी होतात. पहिले एक-दोन पाऊस जोराचे ४० ते ५० मिमी असावेत तसेच या कालावधीत ढगाळ वातावरण राहून पाच ते सहा दिवसांची पावसाची झड असावी. हवेतील आर्द्रता ८० ते ९० टक्के आणि सरासरी तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस असावे, अशा अनुकूल हवामानात संत्र्याला मृग बहार येतो. परंतु, ही परिस्थिती निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षांपासून उपलब्ध झाली नाही.
ताणाच्या कालावधीत अकाली पाऊस पडल्यास लगेच दुसऱ्या दिवशी १००० पीपीएम सायकोसिलची फवारणी करावी. संत्रा झाडाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे माफक कृत्रिम ताण द्यावा. बहर धरण्याच्या कालावधीत मशागत करू नये.
प्रा. राजेंद्र जाणे, कृषी शास्त्रज्ञ, अमरावती
सलग चौथ्या वर्षी केलेला खर्च वाया जात आहे. मे महिन्यातील अवकाळीने ताण तुटला. संत्रा पालवीने टवटवी घेतली आहे. शासनाने संत्रा फळ बागायतदारांना आर्थिक मदत द्यावी.
किशोर चोरोडे,संत्रा उत्पादक शेतकरी, नांदगाव
मे महिन्यातील अवकाळीने तोंडचा घास हिरावला. आता मृग बहर येणे शक्य नाही. शासन, विमा कंपनी पीकविमा देत नाही.
राजाभाऊ गुडधे,संत्रा उत्पादक शेतकरी, अमडापूर

