ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रशिक्षण

शुभांगी लोखंडे बनली दारोदारी जाऊन सुया-फणी विकणाऱ्या वैदू समाजातील पहिली महिला डॉक्टर – शुभांगी लोखंडे

अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी गावातील शुभांगी लोखंडेनं वैदू समाजातील राज्यातील पहिली महिला डॉक्टर बनण्याची कामगिरी केली आहे.

 

अहिल्यानगर : सुया घे…,फनी घे…, अशा आवाजात गावोगावी भटकंती करणाऱ्या महिला आणि डबे घ्या चाळणी घ्या म्हणत दारोदारी फिरणारे पुरुष, अशी पारंपरिक ओळख असणाऱ्या भटक्या वैदू समाजातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी गावातील शुभांगी लोखंडे हिनं मिळवला आहे. तिचा हा प्रवास केवळ तिच्या कुटुंबासाठी नव्हे तर, संपूर्ण समाजासाठी दीपस्तंभ ठरत आहे.

आजोबांनी दाखवली दिशा : वैदू समाजात शिक्षणाला फारसा वाव दिला जात नाही. विशेषतः मुलींना शिक्षणापासून लांबच ठेवलं जातं. यामागं माहितीचा अभाव, आर्थिक अडचणी, समाजातील जुनाट रुढी आणि महिलांविषयी असलेली पारंपरिक मानसिकता अशी विविध कारणं आहेत. मात्र, शुभांगीच्या जीवनात एक वेगळं वळण त्या दिवशी आलं. जेव्हा तिचे आजोबा ताया लोखंडे यांनी ठरवलं की, त्यांच्या नातीनं डॉक्टर व्हायचं. आजोबा ताया लोखंडे यांचं शालेय शिक्षण झालेलं नसलं तरी, समाजात मोठा वावर असल्यामुळं शिक्षणाचं महत्त्व त्यांनी मनोमन ओळखलं होतं. समाजात दारोदारी फिरणाऱ्या परंपरेला ओलांडून आपल्या नातीसाठी वेगळी दिशा निवडणं ही एक क्रांतिकारक बाब होती. शुभांगीच्या अभ्यासातील चमक त्यांना लवकरच लक्षात आली होती. त्यामुळं त्यांनी तिच्या शिक्षणासाठी कोणतीही आडकाठी न आणता तिचा पाठिंबा बनण्याचा निर्धार केला.

आई-वडिलांनी उचललं धाडसी पाऊल : शुभांगीला दहावी आणि बारावी परीक्षेत उल्लेखनीय गुण मिळाल्यानंतर तिच्या आई-वडिलांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. तिची आई संगीता लोखंडे आणि वडील लक्ष्मण लोखंडे यांनी समाजात असलेली मुलींना शिक्षण न देण्याची आणि बाहेरगावी न पाठविण्याची रुढी मोडीत काढत तिला पूर्णपणे साथ दिली. हे एक धाडसी पाऊल होतं. कारण, समाजात अशा निर्णयांना अनेकदा विरोध होतो. पण, त्यांनी विरोध झुगारून शुभांगीच्या शिक्षणाला सर्वतोपरी प्रोत्साहन दिलं. वडील लक्ष्मण लोखंडे यांचा व्यवसाय भंगार संकलनाचा असून आई पारंपरिक वस्तू विकण्याच्या व्यवसायात गुंतलेली होती. तरीही त्यांनी आपल्या आर्थिक मर्यादा ओलांडून शुभांगीला चांगल्या शिक्षणासाठी आवश्यक ती मदत केली. त्यांच्या कुटुंबाचा कटलरीचा व्यवसायही तुटपुंजा नफा देणारा होता. पण, स्वप्न मोठं होतं. आपली मुलगी डॉक्टर व्हावी. या स्वप्नासाठी त्यांनी सर्व प्रकारचा त्याग केला.

समाजातील इतर मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणार : शुभांगीनं बारावीनंतर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश करत होमिओपॅथी शाखेत आपलं शिक्षण पूर्ण केलं. तिच्या कठोर परिश्रमामुळं आणि चिकाटीमुळं ती महाराष्ट्रात वैदू समाजातून डॉक्टर होणारी पहिली मुलगी ठरली. ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. तिचा हा प्रवास फक्त तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर, संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. आज शुभांगी केवळ डॉक्टर नाही. तर एक समाजसुधारक बनण्याच्या मार्गावर आहे. ती म्हणते “माझ्या समाजात अजूनही मुलींना शिक्षणापासून लांब ठेवलं जातं. मी स्वतः त्यातून बाहेर पडले म्हणून मला समजतं की, शिक्षण म्हणजे काय? त्यामुळं मी आता माझ्या समाजातील इतर मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणार आहे.”

इच्छा असेल तर, मार्ग निश्चित निघतात : “एम.डी. करुन वंचित समाज बांधवांचं प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्याची इच्छा आहे. तसंच होमिओपॅथी उपचार पद्धतीबाबत सर्व समाजाचा संकुचित दृष्टिकोन व्यापक करुन या वैद्यकीय शाखेचा प्रसार करण्याचीही इच्छा आहे. इच्छा असेल मार्ग निश्चित निघतात, ” असं शुभांगीनं सांगितलं. आंतरिक इच्छाशक्तीला प्रचंड परिश्रमाची जोड देत शुभांगीनं मिळविलेलं हे यश पुढील पिढ्यांसाठी निश्चित दिशादर्शक आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.