क्राइमताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

सिंधुदुर्गातील आरोपी सिद्धेश शिरसाट दोन वर्षांसाठी हद्दपार – SINDHUDURG ACCUSED SIDDHESH SHIRSAT

कुडाळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. अलीकडे गाजलेल्या कुडाळ तालुक्यातील सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणात सिद्धेश शिरसाट हा मुख्य आरोपी आहे.

सिंधुदुर्ग- कुडाळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सिद्धेश अशोक शिरसाट (४३, रा. कुडाळ बाजारपेठ) याला दोन वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी (कुडाळ) यांनी दिले आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून त्याला हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. कुडाळ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. दरम्यान, अलीकडे गाजलेल्या कुडाळ तालुक्यातील सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणात सिद्धेश शिरसाट हा मुख्य आरोपी आहे.

गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या जीविताला तसेच मालमत्तेला कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होऊ नये. नागरिकांना भयमुक्त अशा वातावरणात राहाता यावे, यासाठी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (सावंतवाडी) विनोद कांबळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतत गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेश कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना दिले होते.

गुन्हेगार सिद्धेश शिरसाट याच्यावर हद्दपारीची कारवाई : पोलीस निरीक्षक मगदूम यांनी गेल्या काही वर्षांत तसेच सद्यस्थितीत सतत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित केलीय. त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धेश शिरसाट याच्याविरुद्ध खून, सरकारी नोकराला मारहाण, मालमत्तेचे नुकसान करणे, दारू वाहतूक करणे, जुगार चालविणे, लोकांना धमकावणे यांसारखे गंभीर गुन्हे अभिलेखावर नोंद असल्याची माहिती उपलब्ध झाल्याने त्याच्याविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यासाठीचा अहवाल उपविभागीय दंडाधिकारी (कुडाळ) यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार सराईत गुन्हेगार सिद्धेश शिरसाट याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आलीय.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.