कृषीताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

सावधान! बोगस बियाणे, खतं विक्री करणार्‍यावर प्रशासनाचा ‘वॉच’

तालुकास्तरावर भरारी पथक

सालई खुर्द : खरीप हंगाम तोंडावर असून , त्यानुषंगाने कृषी विभागही अलर्ट झाल्याचे चित्र दिसत आहे. विविध प्रकारचे बियाणे, खत छापील किंमतीनुसार मिळते की नाही; अथवा अन्य बाबतीत असलेल्या तक्रारी शेतकर्‍यांना सहजरित्या नोंदविता याव्यात यासाठी कृषी विभागाने तक्रार निवारण कक्ष सुरू केले आहेत. त्यामुळे  शेतकर्‍यांसाठी तक्रार नोंदविणे सोपे झाले आहे.
शेतकर्‍यांना योग्य दरात चांगल्या दर्जाची बियाणे व खत मिळावे, यासाठी कृषी विभागामार्फत बियाणे व खतांच्या पुरवठा व गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. दुसरीकडे, बोगस बियाणे व खत विक्री करणार्‍यांवर आता प्रशासनाचा वॉच राहणार असून कृषी विभागाने तालुकानिहाय एक याप्रमाणे सात तर जिल्हास्तरावर एक स्वतंत्र भरारी पथक नेमले आहे. त्यामुळे आता बोगस बियाणे,  खतांची विक्री करण्यार्‍यांवर कारवाई होणार आहे.
खरीप हंगाम च्या पूर्व तयारीत बळीराजा व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा सुरू होताच बियाणे व खताचे दर वाढविले जातात. तसेच या कालावधीत शेतकर्‍यांच्या माथी बोगस बियाणे मारण्याची शक्यता अधिक असते. परिणामी, शेतकर्‍यांची फसवणूक होते व शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळते. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी कृषी विभागाने बोगस बियाणे, खत विक्रीवर आळा ठेवण्यासाठी भरारी पथक तयार केले आहेत. पथक बोगस बियाणे व खत विक्री करणार्‍यांवर कारवाई करणार असून कृषी केंद्रामध्ये जावून बियाण्यांची तपासणी सुद्धा करणार आहे. जिल्हास्तरीय पथक  तयार करण्यात आले असून या जिल्हास्तरीय पथकामध्ये सहा अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे.
मोहाडी तालुका स्तरावरील पथकामध्ये सहा अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. यात  मोहाडी तालुक्याच्या पथकाचे प्रमुख मोहाडी तालुका प्रभारी कृषी अधिकारी सुनील भडके, सदस्य एस.एस.न्यायमूर्ती कृषि अधिकारी पं.स.मोहाडी, निरीक्षक वजन मापे मोहाडी ए.आर.कोहरू, मोहाडी मंडळ कृषी अधिकारी एस.एन.भडके, आंधळगाव मंडळ कृषी अधिकारी, कृषि अधिकारी (ता.) ता.कृ.अ.मोहाडी डी. घोडमारे यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येक तालुक्यात एक पथक जिल्हास्तरीय पथकाव्यतिरिक्त जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, लाखनी, पवनी, साकोली, लाखांदूर व भंडारा तालुक्यामध्ये प्रत्येक एक-एक पथक गठीत करण्यात आले आहे. एकूण तालुक्यात सात तर जिल्हास्तरावर एक असे एकूण आठ पथके कार्यान्वित केले आहेत.
बोगस बियाणे व खते विक्री  करणार्‍यावर फौजदारी दाखल करण्यात येईल. शेतकर्‍यांनाही बोगस बियाणे-खतं विक्री करताना आढळून आल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क करावा किंवा तक्रार निवारण कक्षातील  क्रमांकावर शेतकर्‍यांना त्यांच्या शंका, अडीअडचणी आणि तक्रारी नोंदविता येणार आहेत.
-संगीता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा
पेरणीपूर्वी बियाणे पारखून घ्यावे, शेतकर्‍यांनी विशिष्ट कंपनीच्या बियाण्याचा आग्रह न धरता घरगुती बियाण्याची उगवणक्षमता तपासून पेरणीसाठी वापरावे. मात्र, पेरणीपूर्वी बियाण्यावर बीजप्रक्रिया करून घ्यावी. तसेच विविध कंपन्याचे बियाणे खरेदी करताना खात्री करूनच घ्यावे, बियाणे व खते घेताना ठरलेल्या किंमतीत मिळेल हे तपासावे. शेतकर्‍यांची फसवणूक झाल्यास तात्काळ कृषि विभागाची संपर्क करावा.
-सुनिल भडके, प्रभारी तालुका कृषी अधिकारी मोहाडी
खरीप हंगाम लागताच कृषि केंद्र चालक मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांची फसवणूक करतात, ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत घेऊन बियाणे व खते शेतकर्‍यांच्या माती मारले जाते. कृषि विभागाने कृषि केंद्रचालकावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
-जगदीश शेंडे, सभापती पं.स.मोहाडी
FacebookWhatsappInstagramTelegram
शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.