तुमसरमध्ये आठ वर्षीय बालकाचा कालव्यात बुडून मृत्यू
तुमसर : तुमसर शहरात गुरुवारी सायंकाळी एक हृदयाला चटका लावणारी घटना घडली. शिवनगर येथे राहणार्या रफिक शेख यांचा आठ वर्षीय मुलाचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना तामसवाडी रस्त्यावरील कालव्यात दि. ५ जून २०२५ रोजी सायं. ५.३० वाजत्या दरम्यान घडली. अल्ताफ रफिक शेख(८) रा. तुमसर असे मृतक बालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अल्ताफ त्याच्या भावासह आणि दोन मित्रांसोबत अंघोळ करण्यासाठी तामसवाडी रोडवरील कालव्यात उतरला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल भागात गेला आणि काही क्षणांतच पाण्यात बुडाला. ही घटना दि. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर काही वेळातच आरडाओरड झाली. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली वेळातच अल्ताफचा मृतदेह कालव्याबाहेर काढला. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांचे डोळे पाणावले होते. या दुर्घटनेने संपूर्ण शिवनगर परिसरात शोककळा पसरली आहे. अल्ताफ हा अतिशय चुणचुणीत आणि हसतमुख स्वभावाचा मुलगा होता, अशी भावना शेजारी आणि नातेवाईक व्यक्त करत आहेत. घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

