“…तर मी स्वतः पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात शिरणार”, बच्चू कडू यांचा इशारा
पोलिसांनी जर आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास दिला तर मी स्वतः मुंबईत पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात शिरणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.

अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रविवारपासून गुरुकुंज मोझरी इथं अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. यावेळी आमचं आंदोलन हे शांततेच्या मार्गानं आहे. तिकडे मुंबईत आमच्या अपंग कार्यकर्त्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. आमचं हे आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पोलिसांनी जर आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास दिला तर मी स्वतः मुंबईत पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात शिरणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.
किमान सहा हजार रुपये मानधन द्यावं : राज्यातील दिव्यांगांना केवळ 1500 रुपये मानधन दिलं जातं. इतक्या पैशात खरंच दिव्यांगांचं भागणार का? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. तसंच, इतर ठिकाणी दिव्यांगांना दहा हजार रुपये मानधन दिलं जातं. आपल्या इथं दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं, तेव्हापासून मी सातत्यानं दिव्यांगांना किमान सहा हजार रुपये मानधन द्यावं, असं म्हणत आलो. मात्र सरकार दिव्यांच्या प्रश्नांकडं लक्ष देत नाही, अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केलीय.
सरकार स्वतः कायदा मोडत आहे : याचबरोबर, शेतकऱ्यांच्या विषयावर आम्ही एक महिन्यांपासून बोलतो आहे. असं असताना सरकार या विषयाची दखल घेत नाही. सात दिवसात उत्तर देणारा सेवा हमी कायदा आता कुठं गेला. खरंतर सरकार स्वतः कायदा मोडत आहे आणि आम्हाला कायदा मोडू नका, असं सांगत असल्याबाबत बच्चू कडू यांनी रोष व्यक्त केलाय.

