ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

“शेतकरी नैराश्यात बुडाला तर…”; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन मराठा आंदोलक मनोज जरांहे पाटील हे देखील आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारवर त्यांनी हल्लाबोल केलाय.

अमरावती : राज्याच्या पूर्णत्वाची जबाबदारी शेतकऱ्यांनी आपल्यावर दिली. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळेल याची काळजी घ्यायला हवी. आपल्या राज्याचा आपला मुख्यमंत्री हा माझा मुख्यमंत्री आहे अशी भावना शेतकऱ्यांची असायला हवी. आपल्या राज्यात मात्र परिस्थिती तशी नाही. शेतकरी अडचणींत आहे. सरकार आपलं काम करत नाही असं वाटून हा शेतकरी जर नैराश्यात बुडाला तर सगळी प्रस्थितच अवघड होईल, असं म्हणत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी गुरकुंज मोझरी येथे पत्रकारांशी संवाद साधला.

बच्चू कडू यांची घेतली भेट : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी यासह दिव्यांग आणि विधवा महिलांना सहा हजार मानधन देण्यात यावं यासह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी गत चार दिवसांपासून गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू यांची भेट घेण्याकरिता मनोज जरांगे पाटील गुरुकुंज मोझरी येथे आले होते.

दिव्यांगांबाबत ठेवावा भान : “दिव्यांग व्यक्ती कुठलं काम करू शकत नाही. शासनाच्या वतीनं दिव्यांगांना केवळ १५०० रुपये दिले जातात. या १५०० रुपयात आज काय होतं? सरकारनं खरंतर दिव्यांगांच्या विषयावर भान ठेवायला हवं,” असं मनोज जरांगे म्हणाले.

 

हीच आंदोलनाची योग्य वेळ : “शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग केलंय. खरंतर आता या क्षणाला राज्यभरातील सर्व शेतकरी संघटनांच्या अध्यक्षांनी एकत्र येणं गरजेच आहे. हीच खरी आंदोलनाची वेळ आहे. शेतकरी संघटनांच्या अध्यक्षांनी प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना आंदोलनासाठी तयार करायला हवं. गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची ही संधी आहे,” असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

मराठा आरक्षणावर आज बोलणार नाही : “न्यायालयात मराठा आरक्षणाचा निर्णय काय येईल यावर बोलायचा आज विषय नाही. आज बच्चू कडू यांच्या आंदोलनासाठी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी आलो आहे. आज केवळ शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळावा यावरच बोललेलं बरं,” असं मनोज जरांगे म्हणाले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.