बच्चू कडूंना आमचे नेते भेटले, वेगळं भेटण्याचं काही कारण नाही : पंकजा मुंडे

अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मुख्य मागणीसह एकूण 17 मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेलं अन्नत्याग आंदोलन काल (14 जून) राज्य सरकारच्या आश्वासनानंतर मागे घेतलं आहे. दरम्यान, याबाबत भाजपाच्या नेत्या आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे. आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः बच्चू कडूंना भेटायला गेले होते. तसंच, फोनवर बच्चू कडू यांच्याशी आपलं बोलणं झालं असून त्यांना वेगळं भेटण्याचं काही कारण नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
बच्चू कडू यांची भेट घेणार का? : दरम्यान, भाजपाचे शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांनी शनिवारी सायंकाळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर रविवारी सकाळी पंकजा मुंडे यांनी अमरावतीचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवीचं दर्शन घेतलं. यानंतर पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांची तुम्ही भेट घेणार का? असा सवाल पंकजा मुंडे यांना करण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितलं की, “अमरावतीचे पालकमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असणारे आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः बच्चू कडूंना भेटायला गेले होते. मी फोनवर बच्चू कडू यांच्याशी बोलले. शेळी, मेंढींसंदर्भात जे काही त्यांचे विषय आहेत. ते आम्ही करणार आहोत. तसंच, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवोत, अशा त्यांना शुभेच्छा दिल्यात. आमचे वरिष्ठ नेते त्यांना भेटले आहेत. आता त्यांना वेगळं भेटण्याचं कारण नाही,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
प्लास्टिक निर्मूलनासाठी हवा सर्वांचा पुढाकार : “पर्यावरण संकलनासाठी प्लास्टिक बंदी अतिशय महत्वाची आहे. प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती गरजेची आहे. बाजारात भाजीवाला, फुलवला, फळवाला आपल्याला प्लास्टिकची पिशवी देईल, अशी अपेक्षा न ठेवता प्रत्येकांनी सोबत कापडाची पिशवी नेली तर प्लास्टिक पिशवीचा वापर हळूहळू कमी होत, बंद होईल. पर्यावरणातून प्लास्टिकचं निर्मूलन करण्यासाठी सर्वांचाच पुढाकार गरजेचा आहे, ” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
मुंडे साहेबांच्या मंदिरासाठी माझी वाट पाहू नका : मेळघाटात गोलाई या गावात गोपीनाथ मुंडे यांचं मंदिर उभारण्यात आलंय. मंदिरात गोपीनाथ मुंडे यांची मूर्ती तयार करण्यात आली. या मूर्तीची मंदिरात स्थापना पंकजा मुंडे यांच्या हस्तेच होईल, असा ग्रामस्थांचा हट्ट आहे. याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या की, “महाराष्ट्रात एकाच ठिकाणी नव्हे तर अनेक ठिकाणी मुंडे साहेबांची मंदिरं उभारण्यात आली आहेत. तसंच या सगळ्या ठिकाणी माझी वाट पाहणं सुरू आहे. खरंतर माझी वाट न पाहता मंदिरात मूर्ती स्थापन करावी. या मंदिरांना मी पुढं नक्की भेट देणार आहे, ” असं पंकजा मुंडे म्हटलं आहे.
…ही फार मोठी बाब : याचबरोबर, “देशात अकरा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत देशाला 2047 पर्यंत महासत्ता बनविण्याच्या दिशेनं सुरू असलेले प्रयत्न हे फार मोठे आहेत. देशात विविध क्षेत्रात विकासाची घेतलेली झेप ही फार मोठी आहे. गरीबांना घरं, उज्वला योजनेच्या माध्यमातून घरोघरी आलेला गॅस, शेकडो अशा अनेक योजना खालच्या माणसांचं जीवनमान उंचविणाऱ्या आहेत. मोदींच्या नेतृत्वात आम्हाला काम करायला मिळतंय ही फार मोठी बाब आहे, ” असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

