कुलरचा शॉक लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू: पावसाळ्यात कुलर वापरताना घ्या काळजी
कुलरचा शॉक लावून दोन चिमुकल्यासह आईचा मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील चमक या गावात घडली आहे.

अमरावती : कुलरचा शॉक लागल्यानं एका 33 वर्षीय महिलेसह तिच्या चार वर्ष आणि दोन वर्षीय चिमुकल्यांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना अचलपूर तालुक्यातील चमक (बु.) या गावात शनिवारी सांयकाळी घडली. एका क्षणात पत्नी आणि दोन चिमुकल्यांच्या मृत्यूमुळं लक्ष्मण कास्देकर यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. या घटनेनं संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुमती लक्ष्मण कास्देकर (33), श्वेता लक्ष्मण कास्देकर (4) आणि विकी लक्ष्मण कास्देकर (2, सर्व रा. चमक, अचलपूर) असे मृतकांची नावं आहेत.
अशी घडली घटना : लक्ष्मण कास्देकर हे त्यांच्या कुटुंबीयांसह चमक इथं वास्तव्याला आहेत. लक्ष्मण कास्देकर यांचं मुळगाव मेळघाटातील काटकुंभजवळ दहेन्द्री हे आहे. लक्ष्मण कास्देकर हे मागील 25 वर्षांपासून चमक याच ठिकाणी स्थायिक झालेत. शनिवारी सकाळी ते हार्वेस्टींगच्या कामावर घरुन बाहेर पडले. ते गावाच्या आजूबाजूला कामासाठी गेले होते. दरम्यान रात्री नऊ ते साडेनऊ वाजता ते कामावरुन घरी परत आले असता, त्यांना कुलरजवळ त्यांची पत्नी व दोन चिमुकले मुलं निपचित पडलेले दिसले. त्यांनी आवाज दिला असता कोणीही प्रतिसाद देत नव्हते. त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना आवाज दिला, त्यावेळी या तिघांनाही कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला. या घटनेनं लक्ष्मण तर पूर्णत: हादरले. ही माहीती तातडीनं सरमसपुरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठलं. तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले. या तिन्ही मृतदेहांवर रविवारी शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांच्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी सरमसपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या घटनेनं संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मुलीला वाचवताना आईचा गेला बळी : मुलीला वाचवण्यासाठी आई गेली, अन् आईला बाळानं हात लावल्यानं ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. “घटना घडली त्यावेळी कास्देकर यांच्या घरात कोणीही नव्हतं. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती पाहता सुरूवातीला चार वर्षीय श्वेताला कुलरचा शॉक लागला. श्वेताला वाचवण्यासाठी तीची आई सुमती गेली. त्यामुळे आईलासुध्दा शॉक लागला आणि आईजवळ दोन वर्षांचा निरागस विकी गेला आणि त्याला सुध्दा विजेचा झटका लागला, असा हा घटनाक्रम असावा,” असा प्राथमिक निष्कर्ष असल्याचं सरमसपुराचे ठाणेदार निलेश गोपाल चावडीकर यांनी वर्तवला.

