नागपुरात एका दिवसात प्रेमप्रकरण, जुना वाद आणि सूडाच्या भावनेतून तिघांची निर्घृण हत्या
नागपुरमध्ये २४ तासात तीन हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नागपूर : उपराजधानी नागपुरमध्ये २४ तासात तीन हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरण, जुना वाद आणि सूडाच्या भावनेतून तिघांची निर्घृण हत्या झाली आहे. गोरेवाडा जंगलामध्ये अमन गजेंद्र ध्रुववंशी या तरुणाची प्रेमसंबंधातून हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेमध्ये जिल्ह्यातील खापा येथील गांधी चौकात चेतन अशोक गागटेवर भरदिवसा सिनेस्टाईल गोळीबार करण्यात आला. तिसऱ्या घटनेत कुही तालुक्यातील पांचगाव भागात चौकीदार सुमंतलाल मरस्कोल्हे याची हातपाय बांधून हत्या करण्यात आल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली.
सिनेस्टाईल गोळीबार : खापा येथील रहिवासी चेतन गागटे या तरुणावर गोळीबार करण्यात आला. चेतन आणि आरोपी अर्जुन शेषराव निळे यांच्यात गेल्या आठ वर्षांपासून जुना वाद होता. रविवारी सकाळी चेतन गांधी चौकातील पानटपरीवर बसलेला असताना आरोपी अर्जुन त्याच भागातून दुचाकीवरून जात होता. चेतन दिसताच त्याने दुचाकी थांबवून पाठलाग सुरू केल्यानंतर गोळीबार देखील सुरू केला. पहिली गोळी गांधी पुतळ्याजवळ चुकली. दुसरी गोळी बोंद्रेतील सरकारी धान्य दुकानाजवळ चुकली. मात्र, चेतन अरुंद गल्लीत पळताना अडखळून पडला, आणि त्या संधीचा फायदा घेत आरोपी अर्जुनने त्याच्यावर तिसरी गोळी झाडली. गोळी थेट छातीत घुसली. यानंतर त्याने चौथी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला,पण ट्रिगर अडकल्याने चौथी गोळी फायर झाली नाही. जखमी चेतनला तातडीने नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेनंतर आरोपी अर्जुन थेट खापा पोलीस ठाण्यात गेला व स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी त्याला अटक केली असून, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांनी घटनास्थळी भेट दिली.
चौकीदाराची हत्या : नागपूरजवळ असलेल्या कुही तालुक्यातील पाचगाव पोलीस चौकी हद्दीत, कळमना-उमरेड मार्गावर एका बांधकामस्थळावर असलेल्या चौकीदाराची हत्या करण्यात आली. कामावर असलेल्या तीन मजुरांनीच ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुमंतलाल मरसकोल्हे असे हत्या झालेल्या चौकीदाराचे नाव आहे. नागपूर येथील बबनराव मगरदे यांच्या कळमना-उमरेड भागात घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाच्या देखरेखीसाठी त्यांनी सुमंतलाल मरसकोल्हे यांना चौकीदार म्हणून कामावर ठेवलं होतं.
प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या : प्रेमप्रकरणातून अमन राजेंद्र ध्रुववंशी तरुणाला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून त्याची गोरेवाडा जंगल परिसरात हत्या करण्यात आली. एका आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन ही माहिती दिली. यानंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींमध्ये लकी सुनील मेंढेवार, अभिषेक राजेश कटारिया, सुलभ ठाकूर आणि एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा यांचा समावेश आहे. अमन हा शिमला येथील एका कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होता. लकी आणि इतर आरोपी हे खासगी संस्थांमध्ये हाउसकीपिंगचं काम करतात. एका तरुणीशी अमन व लकी दोघांचे प्रेमसंबंध होते, पण दोघांनाही एकमेकांबाबत माहिती नव्हती. काही महिन्यांपूर्वी अमन आणि ती मुलगी फिरायला गेले असताना अपघात झाला आणि लकीला त्यांच्या संबंधाची माहिती मिळाली. त्यानंतर वाद झाले, अमनने संबंध तोडले, पण लकीला संशय कायम राहिला.
बनावट इंस्टाग्राम आयडी तयार केली : लकीनं त्या मुलीच्या नावे बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून अमनशी चॅटिंग सुरू केली. त्याच आयडीवरून अमनला मिलिटरी ग्राउंडजवळ बोलावलं होतं. लकी आणि अभिषेक तिथे पोहोचले. अमन आल्यावर वाद सुरू झाला. अमनने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण लकीने चॅटिंगचे पुरावे दाखवले. त्यानंतर त्यांनी अमनला दुचाकीवर बसवून गोरेवाडा जंगलातील टेकडीवर नेलं. तिथं सुलभ व अल्पवयीन आरोपीही आले. चारही जणांनी अमनवर हल्ला केला. त्याच दरम्यान लकीने चाकूने अमनच्या छातीवर वार केला. यात अमनचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चारही आरोपी घरी पळून गेले. मात्र, अभिषेकने घाबरून मानकापूर पोलीस ठाण्यात हत्येची कबुली दिली. पोलीस निरीक्षक हरीश कालसेकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अमनचा मृतदेह मेयो रुग्णालयात पाठवला. या प्रकरणातील ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

