तुमच्या सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय फायदा? कुंडमळा पूल दुर्घटनेवरून राज ठाकरे यांनी सरकारला फटकारलं
पुण्याच्या कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, या घटनेत अनेक जण वाहून गेलेत. यानंतर आता राज ठाकरे यांनी सरकारला फटकारलं आहे.

मुंबई – पुण्यात मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर रविवारी (15 जून) एक धक्कादायक घटना घडली. या नदीवरील पूल अचानकपणे कोसळला, या दुर्घटनेत अनेक जण वाहून गेले आहेत. तर आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच या दुर्घटनेतून 51 जणांना वाचवण्यात आले. आता या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केलीय. ‘सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की करतात काय? असा सवाल राज यांनी केलाय.
मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पावसाळ्यात या ठिकाणी अनेक पर्यटक भेट द्यायला येतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. हाच पूल रविवारी दुपारी 3:30 वाजता कोसळला. या दुर्घटनेत अनेक जण वाहून गेले, ते अद्यापही बेपत्ता आहेत. यानंतर आता आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट लिहून सरकारला फटकारलं- राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली असून, यात त्यांनी म्हटले आहे की, “काल मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जण वाहून गेले आणि काही जण मृत्युमुखी पडले. नक्की हानी किती झाली आहे, याचा अंदाज आलेला नाही. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
तुमच्या अनुभवाचा उपयोग काय?- या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या नेत्यांनाही फटकारलं आहे. इतकी वर्षे सत्तेत राहूनही नियोजन करता येत नसल्याचे सांगत राज यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. ते पुढे लिहितात की, “प्रत्येक घटनेनंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य वेगाने सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे.’ पण मुळात हा प्रसंग का येतो? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही का? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून घेता येत नाहीत का? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा राज्याला काय उपयोग?”, असंही राज ठाकरे म्हणालेत.
लोकांनीही उत्साहाला थोडासा आवर घालावा- सत्ताधाऱ्यांसोबतच राज यांनी अतिउत्साही जनतेलाही महत्त्वाचा सल्ला दिला आहे. अशा प्रसंगी लोकांनीही अधिक समजुतदारीने आणि काळजीने वागण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. “अशा प्रसंगी लोकांनीदेखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते, असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क राहायला हवं. आता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पडणं अशा घटना सुरू झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पाहावं,” असं लिहित राज ठाकरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना केलीय.

