ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

देशभरात मान्सून सक्रिय; केरळ, तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद

देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. आज अनेक राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हैदराबाद : भारतीय हवामान विभागानं (IMD) सोमवारी (१६ जून) कर्नाटक, केरळ आणि गोव्यासह महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं सखल भागात पाणी साचण्याची शक्यताही वर्तवली आहे. लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात रायगडला रेड तर मुंबई जिल्ह्याला यलो अलर्ट– राज्यभरात पाऊस सक्रिय झाला आहे. सोमवारपर्यंत विदर्भाच्या काही भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणामध्ये रत्नागिरी, डहाणू येथे मुसळधार पाऊस नोंदवला गेला आहे. तर मुंबईमध्येही दिवसभरात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसला. मुंबईला यलो अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

केरळात मुसळधार पाऊस, अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद– केरळमध्ये रविवारपासून सतत पाऊस पडत आहे. आयएमडीनं १८ जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आणि 6 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी त्रिशूर, कन्नूर, वायनाड, कोझिकोड, इडुक्की, एर्नाकुलम, मलप्पुरमसह ११ जिल्ह्यांमधील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अलाप्पुझा जिल्ह्यातील कुट्टनाड तालुक्यातही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, केरळ आणि माहे किनारपट्टीच्या भागात ३.४ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने, १८ जूनपर्यंत मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.

  • तामिळनाडूतील नीलगिरी जिल्ह्यातही शाळा बंद – तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे, सोमवारी ऊटी (उधगमंडलम), कुंडा, गुडालूर आणि पंडालूर तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन केलं आहे.

दिल्लीत पावसामुळे उष्णतेपासून दिलासा – रविवारी सकाळी दिल्लीत हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली. यामुळे कडक उन्हापासून दिलासा मिळाला. हवामान खात्याने राजधानीच्या काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये 50-60 किमी/ताशी वेगाने वारे वाहतील. वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सफदरजंग, लोधी रोड आणि पुसा भागात 27 ते 33.5 मिमी पावसाची नोंद झाली. पावसानंतर, हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) 62 पर्यंत सुधारला, जो “समाधानकारक” श्रेणीत येतो. सोमवारी किमान तापमान 23 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

उत्तराखंड, ओडिशा आणि छत्तीसगडमध्येही अलर्ट जारी– उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा अलर्ट आठवडाभर राहू शकतो. दुसरीकडे, छत्तीसगड आणि ओडिशामध्येही जोरदार वारे, वीजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वाराणसीत सर्वाधिक उष्णता, तापमान 43 अंश सेल्सिअसच्या पुढे– रविवारी वाराणसी हे देशातील सर्वात उष्ण शहर होते. येथे कमाल तापमान 43.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. याशिवाय, ओरई, गाजीपूर, सिरसा (हरियाणा), भटिंडा (पंजाब), सिधी (मध्य प्रदेश) आणि चुरू (राजस्थान) यासारख्या भागातही 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या उष्णतेने ग्रस्त भागात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती आहे.

मदतीसोबतच दक्ष राहणंही आवश्यक– एकीकडे मान्सूनच्या पावसामुळे देशाच्या अनेक भागात उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे मुसळधार पाऊस आणि पूर येण्याची शक्यता असल्यानं दक्षताही तितकीच महत्त्वाची आहे. लोकांना हवामान खात्याच्या इशाऱ्यांचे पालन करण्याचा आणि स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.