ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

सावंतवाडी टर्मिनसचे काम अद्यापही अपूर्णच, प्रवासी संघटनेने केले अनोखे आंदोलन –

रेल्वे प्रवासी संघटनेकडून साखर वाटून आणि भूमिपूजन दगडाच्या आकाराचा केक कापून गांधीगिरी मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधले.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला शुक्रवारी 10 वर्षे पूर्ण झाली असली तरी ते अद्यापही पूर्ण न झाल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानकावर अनोख्या पद्धतीने ‘वाढदिवस’ साजरा करत आपला निषेध नोंदवला. रेल्वे प्रवासी संघटनेकडून साखर वाटून आणि भूमिपूजन दगडाच्या आकाराचा केक कापून गांधीगिरी मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधले.

महत्त्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळ खात पडले : 27 जून 2015 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या टर्मिनसचे भूमिपूजन झाले होते. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असले तरी, दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झालेले नाही, त्यामुळे हे महत्त्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळ खात पडले आहे. या रखडलेल्या कामामुळे प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी गप्प असल्याबद्दल प्रवासी संघटनेने खंत व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साखर वाटून, केक कापून आणि पोलीस, रेल्वे कर्मचारी, प्रवासी, रिक्षाचालक यांना साखर देऊन हे आंदोलन करण्यात आले.

एकाच पक्षाची सत्ता राज्यात आणि केंद्रात : यावेळी अध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर म्हणाले की, 10 वर्षे हा प्रकल्प रखडलेला आहे. एकाच पक्षाची सत्ता राज्यात आणि केंद्रात आहे. त्याच सरकारने भूमिपूजन केल्यानंतरही प्रकल्प पूर्ण होत नसेल तर ही क्षम्य बाब नाही. सरकारला जाग आणण्यासाठी आणि अर्धवट कामाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. केवळ रेल्वे मंत्री बदलले म्हणून प्रकल्प अर्धवट ठेवणे योग्य नाही. प्रकल्प पूर्ण करायचा नसेल तर जनतेची फसवणूक केल्याचे जाहीर करा.

रिक्षा व्यावसायिक आणि रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी : या अनोख्या आंदोलनात सचिव मिहिर मठकर, सल्लागार सुभाष शिरसाट, सल्लागार अॅड सायली दुभाषी, विनायक राऊळ, पुंडलिक दळवी, विजया पेडणेकर, भूषण बांदिवडेकर, पांडुरंग राऊळ, सागर तळवडेकर, तेजस पोयेकर, अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, सिद्धार्थ निंबाळकर, मंगेश सावंत, चंद्रकांत राघो कोरगावकर, रवी सातवळेकर, पांडुरंग परब, नारायण मसुरकर, प्रमोद खानोलकर, रफिक मेमन, लवू नाईक, एकनाथ नाटेकर, राजेंद्र वरडे, प्रकाश भाईंडकर, दिलीप कुलकर्णी, काका पांढरे, नितीन गावडे, विनायक गांवस यांच्यासह रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, रिक्षा व्यावसायिक आणि रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.