ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

सरकार लक्ष देईना! आदिवासी बांधवांच्या मरणयातना सुरूच; भर पावसात 20 किलोमीटर पायपीट करून रुग्णाला रुग्णालयात पोहोचवलं

नंदुरबार जिल्ह्यातील केलापाणी गावात रस्ता नसल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णाला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी 20 किमी पायी प्रवास करावा लागतो.

नंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या मरणयातना संपता संपत नसल्याचं चित्र पुन्हा समोर आलं आहे. अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावाला अनेक वर्षंपासून रस्ता नाही, यामुळे रुग्णालय गाठण्यासाठी रुग्णाला 15 ते 20 किलोमीटर जंगलातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. तर पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी दऱ्याखोऱ्यातून वाट काढावी लागते. या सर्व अडचणींकडं प्रशासन लक्ष देत नाही, यामुळे या भागातील आदिवासी बांधव संताप व्यक्त करत आहेत.

झोळीतून रुग्णालयात न्यावं लागलं : अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावातील रतीलाल पारता पाडवी या 30 वर्षीय आदिवासी बांधवाला गेल्या दोन दिवसांपासून पोटाचा त्रास होता. त्याला रुग्ण्यालयात पोहोचवण्यासाठी बांबूच्या झोळीतून केलापाणी ते तोरणमाळ हे 15 ते 20 किलोमीटरचं अंतर मुसळधार पावसात जंगलातून वाट काढत पार करावं लागलं. केलापाणी गावात जायला रस्ताच नसल्याने नेहमीच गरोदर महिला असो किंवा इतर रुग्ण असो त्यांना बांबूच्या झोळीतून झाडा-झुडपातून, डोंगर-दर्‍यातून वाट काढत रुग्णालय गाठावं लागतं. गावकऱ्यांनी रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी वारंवार शासन दरबारी आपली व्यथा मांडली, पण निराशाच पदरी पडली. दुर्गम भागातील आदिवासी बांधवांकडं प्रशासन सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

 

ग्रामस्थानं व्यक्त केला संताप : “रुग्णांना बांबूच्या झोळीतून रुग्णालयात पोहोचवणं, हे नित्याचंच झालं आहे. आम्ही शासनापुढं पुढे हात पसरून आता थकलो आहोत अनेक मागण्या, अनेक निवेदनं देऊन देखील आमच्याकडं दुर्लक्ष होत आहे. आमदार, खासदार किंवा आदिवासी विकास मंत्री हे देखील आदिवासीच आहेत, मात्र तरी त्यांना आदिवासी बांधवांचं दुःख आणि त्यांच्या समस्या का दिसत नाहीत? असा प्रश्न केलापाणीचे ग्रामस्थ करीत आहेत.

दूषित पाण्यामुळे प्रत्येक घरात रुग्ण : केलापाणी गावात पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्यानं ग्रामस्थांना गावापासून काही अंतरावर असलेल्या झऱ्यातून पाणी आणावं लागतं. या दूषित पाण्यामुळे पोटाच्या विकारानं ग्रामस्थ त्रस्त आहेत. रस्ता नसल्यानं आरोग्य व्यवस्था पोहोचत नाही. केलापाणी गावातील आदिवासी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता, वीज, पाणी आणि नेटवर्कसाठी राजकीय नेते आणि प्रशासनाकडं वारंवार मागणी करत आहेत. मात्र विकासाच्या नावाने गप्पा मारणारे राजकीय नेते आणि प्रशासन कुठलीही दखल घेत नसल्यानं येथील ग्रामस्थ विकासापासून दूर राहिले आहेत.

रस्त्याबाबत पाठपुरावा सुरू- जिल्हा आरोग्य अधिकारी : केलापाणी गावातील रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना सांगितलं. “केलापाणी गाव अतिदुर्गम भागात आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यानं मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वन विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत इथं रस्ता व आरोग्य उपकेंद्र बनविण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. या ठिकाणी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रस्ताव पाठविला आहे.”

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.