ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रशिक्षण

“शिक्षणाधिकारी साहेब पडक्या शाळेत आम्ही शिक्षण घ्यायचं कसं?” विद्यार्थ्यांचा सवाल, 100हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील पिंपळा रुई गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत आहे. याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.

बीड : जीर्ण झालेली इमारत…, इमारतीच्या मागच्या बाजूला पडलेलं मोठं भगदाड…, छताच्या पत्र्याला पडलेलं छिद्र…, यातून वर्गात पडणारं पावसाचं पाणी…, अशी परिस्थिती आहे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील पिंपळा रुई या गावातील जिल्हा परिषदेतील शाळेची. या शाळेची स्थापना 1961 साली झाली. शाळेची इमारतही तेव्हाच बांधण्यात आली. पिंपळा रुई गावातल्या या शाळेत सध्या 100 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेची इमारत कमालीच्या धोकादायक परिस्थितीत आहे. इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिकवणाऱ्या शिक्षकांना अक्षरशः जीव मुठीत ठेवून वावरावं लागतं.

विद्यार्थ्यांना पडवीत उभं राहून घ्यावं लागतं शिक्षण : 1961 साली बांधलेली जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. शासन स्तरावर शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी दिला जातो. मात्र हा निधी शाळेपर्यंत पोहोचत नसल्याचा विद्यार्थ्यांच्या पालकांचा आरोप आहे. निधी नाही म्हणजे शाळेत सुविधा नाहीत. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती होत नसल्यानं पावसाळ्यात छिद्र पडलेल्या पत्र्यामधून वर्गात पाणी येतं. प्रत्येक वर्गात जणू तळं तयार होतं. त्यामुळं विद्यार्थ्यांना पडवीत उभं राहून शिक्षण घ्यावं लागतं.

दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार : बीडच्या वडवणी तालुक्यातील पिंपळा रुई या शाळेची स्थापना 1961 साली झाली. ही शाळा पिंपळा रुई गावातील शिक्षणाचा प्रमुख आधार आहे. मात्र, 54 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही शाळेच्या इमारतीकडं दुर्लक्ष झाल्यानं ती पूर्णतः जीर्ण अवस्थेत पोहोचली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शाळेची भिंत ओलसर होऊ लागली असून छत गळत आहे. भिंतींना मोठं मोठी भगदाडं पडली आहेत. त्यामुळे इमारत कधीही कोसळण्याचा धोका असून शाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक जीवघेणा सापळा बनली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे पालक, शिक्षक आणि गावकरी चिंतेत आहेत. लहान मुलांना शाळेत पाठवताना प्रत्येक दिवस हा भयाण असतो. “जर भविष्यात एखादी दुर्घटना घडली, तर त्यास प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील,” असा थेट इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

वेळेवर उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा : “गावकऱ्यांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीनं प्रशासनाकडं वारंवार शाळेच्या नवीन इमारतीसाठी मागणी केली आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. एकीकडं ‘शिक्षण हक्काचा कायदा’ लागू असूनही मुलांना सुरक्षित शिक्षण मिळत नसेल, तर शासनाची ही मोठी अपयशाची बाब ठरते. पिंपळा रुई शाळेचा प्रश्न केवळ एका गावाचा नसून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचं भयाण वास्तव आहे. तत्काळ नवीन इमारतीचं बांधकाम सुरू करावं, अशी एकमुखी मागणी गावकऱ्यांनी उचलून धरली आहे. प्रशासनानं वेळेवर जागे होऊन उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे,” अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक सतीश शिंदे यांनी दिली.

 

निधी आमच्याकडं आला असता तर दुरुस्ती झाली असती : “आमची शाळा पावसाळ्यात गळते. याबाबत प्रशासनाला अनेक वेळा सांगून देखील शाळेकडं लक्ष दिलं जात नाही. शालेय शिक्षण समिती याकडं दुर्लक्ष करत आहे. अनेक वेळा या शाळेसाठी निधी आला. मात्र तो निधी कुठं गेला याचा थांगपत्ता आम्हाला लागला नाही. शिक्षणाधिकारी यांच्याकडे गेलो असता ते म्हणतात तुमच्या शाळेला निधी दिला आहे. मात्र, निधी आमच्याकडे आला असता तर शाळेची दुरुस्ती झाली असती,” अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण समिती सदस्य शेख नशीर यांनी दिली.

 

विद्यार्थ्यांचा शिक्षण अधिकाऱ्यांना सवाल : “माझी शाळा पावसाळ्यात गळते. पत्र्याला छिद्र पडली आहेत. भिंतीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळं आमच्या शाळेसाठी पैसे द्यावेत. त्याचबरोबर ही शाळा लवकरच दुरुस्त करावी. आम्ही आता शिक्षण घ्यायचं कसं? शाळेची इमारत ढासळत आहे. त्यामुळं आम्हाला शाळेत बसायची भीती वाटते. अशा परिस्थितीत असलेल्या शाळेत आम्ही शिक्षण कसं घ्यायचं?,” असे सवाल विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना विचारले आहेत.

 

विद्यार्थ्यांचा शिक्षण अधिकाऱ्यांना सवाल : “माझी शाळा पावसाळ्यात गळते. पत्र्याला छिद्र पडली आहेत. भिंतीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळं आमच्या शाळेसाठी पैसे द्यावेत. त्याचबरोबर ही शाळा लवकरच दुरुस्त करावी. आम्ही आता शिक्षण घ्यायचं कसं? शाळेची इमारत ढासळत आहे. त्यामुळं आम्हाला शाळेत बसायची भीती वाटते. अशा परिस्थितीत असलेल्या शाळेत आम्ही शिक्षण कसं घ्यायचं?,” असे सवाल विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना विचारले आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.